“जय शिवाजी -जय भारत’पदयात्रेने भंडारा शहरवासी झाले मंत्रगुग्ध

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- फेब्रुवारी २०२५ – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज “जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. या पदयात्रेमध्ये भारतीय राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचे समूहवाचन जिल्हाधिकारी संजय कोलते, जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कूर्तकोटी यांच्यासोबत करण्यात आले. आज सकाळी गांधी चौकातून या पद्धतीने शुभारंभ झाला. नगरपालिका कार्यालयात शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते त्यांच्यासह अन्य विभागप्रमुखांनी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर नूतन कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिवचरित्रातील प्रसंगावर नाटिका, नृत्य, सादर केले. यावेळी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

पदयात्रेला जल्लोषात सुरुवात झाली पदयात्रेमध्ये राष्ट्रीय जीवन्नोती अभियान नगरपरिषद अंतर्गत विविध महिला बचत गटांनी ऐतिहासिक पात्राच्या भूमिकेमध्ये वेशभूषा केली होती. त्यानंतर जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे क्षय रोग मुक्तीसाठी संदेश देणारा निक्षय चित्ररथ देखील पदयात्रेमध्ये सहभागी झाला होता. जिल्ह्यातील मर्दानी खेळांचे सादरीकरण अष्टेंडू आखाडाच्या खेळाडूंनी केले. लेझीम पथक उत्साह वाढवत होते. मर्दानी खेळांच्या सादरीकरणाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. जय भवानी, जय शिवाजीच्या घोषणेने परिसर दुमदुमून गेला. पदयात्रेत जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी सामाजिक संस्था यांच्यासह मोठया संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. पतंजली योग विद्यापीठाच्या भंडारा केंद्राच्यावतीने शास्त्री चौकात योगासनाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.

यावेळी पदयात्रेतील सहभागी नागरिकांनी योगासने पाहून पुढे मार्गक्रमणा केली. तसेच जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, तसेच विविध शासकीय व खासगी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. सकाळी ८ वाजता नगरपालिका, गांधी चौक येथे या पदयात्रेस प्रारंभ झाला. गांधी चौकातून शास्त्री चौक मार्गे शिवाजी वॉर्ड येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ या यात्रेचा समारोप झाला. पदयात्रेदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध सादरीकरण केले. समारोप छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ पुष्पहार अर्पण करून करण्यात आला.

यावेळी सर्व मान्यवरांनी पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले पुतळा समितीचे सर्व सदस्य व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शेकडो विद्यार्थी, खेळाडू, एनसीसी, एनएसएस, विविध क्रीडा संघटनांचे सदस्य, सामाजिक संस्था आणि नागरिक या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी झाले. जयघोषांनी संपूर्ण शहर दुमदुमून गेले. नगरपालिका मुख्याधिकारी भंडारा करण कुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, लोकप्रतिनिधींनी पदयात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *