तुमसर नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सचिन बोपचे यांची बिनविरोध निवड

“३ स्वीकृत सदस्यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब
*पहिल्याच सभेत सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ सिद्ध
तुमसर :– तुमसर नगर परिषदेच्या नवनियुक्त मंडळाची पहिली सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. १६ जानेवारी २०२६) उत्साहात पार पडली. या सभेत उपनगराध्यक्ष पदासाठी सचिन बोपचे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यासोबतच, दीर्घ प्रतीक्षेनंतर नगर परिषदेच्या ३ स्वीकृत (नामनिर्देशित) सदस्यांच्या नियुक्तीवरही अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नामनिर्देशन प्रक्रियेत एकमेव अर्ज
नगर परिषद कार्यालयात दुपारी १ वाजता, पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्ष सागर गभने यांच्या अध्यक्षतेखाली सभेला सुरुवात झाली. उपनगराध्यक्ष पदासाठी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत नामनिर्देशन प्रक्रिया राबवण्यात आली. या कालावधीत सचिन बोपचे यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने, महाराष्ट्र नगरपरिषदा अधिनियमातील कलम ५१ (अ-१-अ) नुसार त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली.

स्वीकृत सदस्यांची घोषणा,- सभेतील दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे स्वीकृत सदस्यांची निवड. नियमानुसार, एकूण निर्वाचित सदस्यांच्या १० टक्के किंवा ५ यापैकी जी संख्या कमी असेल, तितके सदस्य नियुक्त केले जातात. त्यानुसार तुमसर नगर परिषदेसाठी ३ स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.
गटनेत्यांच्या संख्याबळाच्या गुणोत्तरानुसार जिल्हाधिकारी, भंडारा यांनी पाठवलेल्या १० वैध नावांमधून प्रमोद तितिरमारे, हितेश चोपकर आणि शैलेश मेश्राम यांची निवड जाहीर करण्यात आली.
आजच्या सभेत एकूण २५ निर्वाचित सदस्य उपस्थित होते. गटनेत्यांच्या संख्याबळाचा आढावा घेतल्यास—सचिन बोपचे यांच्या नेतृत्वातील गट : ११ सदस्य, गौरीशंकर कारेमोरे गट : ६ सदस्य. अश्विनी थोटे गट : ५ सदस्य, सागर गभने यांच्या शहर विकास आघाडी : ४ सदस्य यातून सत्ताधारी गटाचे वर्चस्व पहिल्याच सभेत स्पष्ट झाले.
अभिनंदनाचा वर्षाव
निवड जाहीर झाल्यानंतर आमदार परिणय फुके यांनी नवनियुक्त उपनगराध्यक्ष सचिन बोपचे यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच आमदार राजू कारेमोरे यांनी तिन्ही स्वीकृत सदस्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
दुपारी ३.१५ वाजता इतिवृत्त वाचनानंतर सभेची सांगता झाली. या निवडींमुळे आता तुमसर नगर परिषदेच्या प्रशासकीय व विकासात्मक कामकाजाला गती मिळणार असून, नवनियुक्त उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्यांवर शहराच्या विकासाची मोठी जबाबदारी असणार आहे.









