प्रधानमंत्री आवास योजनेसाठी तीन वर्षाच्या कराची पावती ग्राह्य धरा
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :-पात्र लाभार्थी प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत म्हणून नियमावलीत बदल करून, रमाई आवास योजनेप्रमाणे तीन वर्षाच्या मालमत्ता कराची पावती गृहीत धरून प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांनाही लाभ दिला जावा, यासाठी माजी खासदार सुनील मेंढे यांनी मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांना पत्र लिहून मागणी केली आहे. प्रधानमंत्री आवास योजना शहरी ही प्रभावीपणे राबविण्यासाठी शासनाने नियमावली तयार केली आहे. परंतु या नियमावलीतील काही अटींमुळे बरेच लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास आले. योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी करताना सातबाराचा उतारा, अखीव पत्रिका किंवा पट्टा ची मागणी केली जाते.
अनेक लाभार्थ्यांकडे जुने दस्ताऐवज नसल्याने तसेच मयत झालेल्या वारसांची नावे भूमी अभिलेख कार्यालयातून कमी करण्यात न आल्याने अर्ज भरताना अडचणी येत आहेत. गरज असतानाही त्यांना योजनेचा लाभ मिळताना अडचणी येत आहेत. अशावेळी रमाई आवास योजनेमध्ये ज्या प्रमाणे तीन वर्ष मालमत्ता कराची पावती ग्राह्य धरण्याचा नियम आहे तसाच नियम प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या बाबतीतही लावला जाऊन, तीन वर्ष मालमत्ता कराची पावती असलेल्या लाभार्थ्यांना लाभ दिला जावा. यासाठी नियमावलीत बदल करावे, अशी मागणी माजी खासदार सुनील मेंढे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.