आठ महिन्यांपासून निराधार योजनेचे मानधन रखडले

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. दिवाळीपासून मानधन रखडले असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे निराधार लाभार्थ्यांचे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. तर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी तुपाशी व निराधार योजनेचे लाभार्थी उपाशी या चर्चेला सर्वत्र उधाण आले आहे. लाभार्थ्यांचे मानधन तात्काळ देण्यात यावे. अन्यथा १९ मे रोजी माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येईल असा इशारा तुमसरचे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे. निराधार योजनेत विधवा, दिव्यांग, परित्यक्त्या, संजय गांधीनिराधार, घटस्फोटीत, वयोवृद्ध अशा लाभार्थ्यांचा समावेश आहे.

शासनाकडून मिळणारे या योजनेच्या लाभार्थ्यांचे मानधन मागील आठ महिन्यांपासून रखडले आहे. लाभार्थी मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना योजना सुरू झाल्यापासून तातडीने दर महिन्याला मानधन दिले जाते. परंतु, निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मानधनाअभावी शासनाने अडचणीत आणले आहे.

यासंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख अमित एच मेश्राम यांच्या माध्यमातून नायब तहसीलदार रमेश खोकले यांना निवेदन देऊन १८ मे पर्यंत अनुदान तात्काळ जमा करण्याची मागणी करण्यात आली. जर अनुदान जमा झाले नाही तर १९ मे येत्यासोमवारी महाविकास आघाडीचे नेते व माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात जन आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी निवेदन देताना स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित मेश्राम, मालती बडवाईक, राधिका चौधरी, क्रांती जिभकाटे, लीला दिवटे, नईमा पठाण, फातमा शेख, कल्पना कौशल, रजनी मेश्राम, मधुकर बांते, वर्षा शेंडे, पुष्पा चांदेवार, विना चिंधालोरे, बाळकृष्ण राऊत, महिना कुंभरे, लीला राऊत, देवराम भरमे, जिरण रहांगडाले, कांता ढोगे, आशा बोरकर यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *