भंडारा येथील लेदे ज्वेलर्स चोरीचा छडा; नागपूरचा आरोपीसह विधीसंघर्षीत बालक ताब्यात

 

भंडाराचे ठाणेदार उल्हास भुसारी यांचे नेतृत्वात कारवाई

 

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- संविधान चौक, भंडारा येथील लेदे ज्वेलर्स या सराफा दुकानाचे शटर फोडून सव्वा पाच लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या चोरीचा भंडारा पोलिसांनी छडा लावला आहे। या प्रकरणी नागपूर येथील एका आरोपीसह एका विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून वरठी येथील दुचाकी चोरीचाही गुन्हा उघडकीस आला आहे।

दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री लेदे ज्वेलर्सचे शटर फोडून अज्ञात इसमांनी ५ लाख ३३ हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेले होते। या बाबत फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता।

तपासात असे निष्पन्न झाले की, सदर गुन्हा दोन आरोपींनी मोटरसायकलवर येऊन केला असून ते नागपूर दिशेकडे पळून गेले आहेत। घटनास्थळ व भंडारा शहरातील सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण करून भंडारा-नागपूर महामार्गावरील व त्यानंतर नागपूर शहरातील शासकीय व खाजगी सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक बाबींचे सलग तीन दिवस विश्लेषण करण्यात आले। त्यानुसार गुन्ह्यात सहभाग असलेला आरोपी नामे गणेश उर्फ गणू वाघाडे, रा. हजारीपहाड, गिट्टीखदान, नागपूर याला अटक करण्यात आली असून एका विधीसंघर्षीत बालकास दि. १७ नोव्हेंबर २६ रोजी ताब्यात घेण्यात आले आहे। त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले स्प्लेंडर प्लस वाहन जप्त करण्यात आले आहे। तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली। आरोपी रेल्वेने वरठी रेल्वे स्टेशन येथे आले आणि तेथून मोटरसायकल चोरी करून भंडारा शहरात येऊन त्यांनी ज्वेलर्स फोडले।

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नूरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, सहायक पोलीस अधीक्षक तेजस सारडा, पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि आशिष बोरकर, पोहवा कुरंजेकर, अंकुश पुराम, अनूप वाल्दे, पोपु रोहन काळे, सुमीत पेशने, रोहित अंबाडे यांनी केली।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *