केसलवाडा फाट्यावर चोरटी रेती वाहतूक करणारा टिप्पर जप्त
४५ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत * एलसीबीची पहाटेची धडक कारवाई
दै. लोकजन वृत्तसेवा
लाखनी :- अवैध रेती वाहतुकीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा यांनी पुन्हा एकदा धडक कारवाई केली आहे. आज दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ०६.०० वाजता लाखनी पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा केसलवाडा फाटा येथे बिना रॉयल्टी चोरटी रेती वाहतूक करणारा टिप्पर पकडण्यात आला. यामध्ये चालक व मालकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून ४५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एलसीबी भंडारा उपविभाग साकोली पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ नागलोट व पोलीस हवालदार बाळाराम वरकडे यांना केसलवाडा फाटा येथून अवैध रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सकाळी पहाटेच सापळा रचून रेड केली.
यावेळी एक रेतीने भरलेला टिप्पर अवैधपणे बिना रॉयल्टी रेती वाहतूक करताना मिळून आला असून आरोपी मनोज ज्ञानेश्वर बारस्कर, वय ३४ वर्षे, रा. मरेगाव (चालक) व हरीश शेंडे, रा. मरेगाव, ता. लाखनी, जि. भंडारा (मालक) या दोघांविरुद्ध पोलीस स्टेशन लाखनी येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अशोक लेलँड कंपनीचा पिवळ्या रंगाचा टिप्पर क्र. एम.एच. ३६ ए.ए. ४४५४ – किंमत ४५ लाख रुपये व ०५ ब्रास रेती किंमत ३० लाख रुपये असा एकूण मुद्देमाल ४५ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जप्त केलेल्या टिप्परसह सहा. पोनि नागलोट व त्यांची टीम
ही यशस्वी कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरक्षनाथ नागलोट व पोलीस हवालदार बाळाराम वरकडे यांनी केली आहे.
पहाटेच्या वेळी चोरट्या मार्गाने रेती वाहतूक करणाऱ्यांवर एलसीबीने केलेल्या या कारवाईमुळे रेती माफियांमध्ये खळबळ उडाली असून तपास लाखनी पोलीस करीत आहेत.






