जिल्हाधिकाऱ्यांकडे दोषींवर कारवाई व रक्कम वसुलीची मागणी करणार

नगर विकास संघर्ष समितीचा इशारा * प्रकरण मोहाडी नगरपंचायतीच्या कथीत मोटरपंप खरेदी व्यवहाराचे

दै. लोकजन वृत्तसेवा

मोहाडी :- नगर पंचायत मोहाडीच्या कारभारातील कथित आर्थिक अनियमिततेचा मुद्दा पेटला असून खोडगाव येथील पाणीपुरवठा पंपावर नवीन मोटरपंप बसविण्याच्या नावाखाली तब्बल ३ लाख ६० हजार रुपयांचे खोटे बिल अदा करून भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप नगर विकास संघर्ष समितीने केला आहे. मात्र, प्रत्यक्षात या मोटारी बसविण्यात आल्याच नसल्याचा दावा समितीने केल्याने नगरपंचायतीच्या या व्यवहारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे.

खोडगाव येथील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवर मोटरपंप बसविले नसतील तर बिल काढले कुणाच्या आदेशाने आणि जनतेचा पैसा नेमका कुठे गेला, असा सवाल उपस्थित करण्यात आला असून मोटरपंप खरेदीचा विषय नगरपंचायतीच्या सामान्य सभेत मांडण्यात आला होता का? ठराव संमत करण्यात आला होता का? सभेच्या इतिवृत्तात त्याची नोंद आहे का? आवश्यक मंजुरी आणि स्वाक्षऱ्यांशिवाय बिल अदा झाले कसे? या व्यवहाराला जबाबदार अधिकारी कोण आणि पदाधिकाऱ्यांना याची माहिती होती का, की पदाधिकाऱ्यांना या व्यवहाराची माहिती देण्यात आलीच नाही, नगराध्यक्ष आणि पाणीपुरवठा सभापती यांच्या म्हणण्यानुसार त्यांना खरोखर अंधारात ठेवून हे व्यवहार झालेच कसे याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

खोडगाव येथील पाणीपुरवठा पंप हाऊससाठी ३ लाख ६० हजार रुपये किमतीची नवीन मोटर खरेदी करून बसविण्यात आल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. मात्र, प्रत्यक्ष पाहणीदरम्यान संबंधित ठिकाणी नवीन मोटर बसविण्यात आल्याचे दिसून आले नसल्याचा दावा नगरसेविका तथा पाणीपुरवठा सभापती अश्विनी प्रवीण डेकाटे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी नगर पंचायत मोहाडीच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन सदर मोटर खरेदी व बसविण्याबाबत सविस्तर माहिती मागितली आहे.

निवेदनानुसार, प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या आधारे त्यांनी नगर पंचायतच्या पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांसह तसेच संबंधित नगरसेवकांच्या उपस्थितीत खोडगाव पंप हाऊसची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी नवीन मोटर बसविण्यात आल्याचे आढळून आले नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. विशेष म्हणजे, आपण पाणीपुरवठा सभापती असतानाही या मोटर खरेदीबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही, अशी खंतही डेकाटे यांनी व्यक्त केली आहे. सदर मोटर कोणत्या कंपनीची खरेदी करण्यात आली, तिची किंमत किती, खरेदी प्रक्रिया कशी राबविण्यात आली तसेच प्रत्यक्ष मोटर बसविण्यात आली आहे किंवा नाही, याबाबत सविस्तर माहिती तातडीने देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणामुळे खोडगावच्या पाणीपुरवठ्यासाठी झालेल्या खर्चाबाबत प्रश्न उपस्थित झाले असून नगर पंचायत प्रशासन यावर काय स्पष्टीकरण देते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

माहिती अधिकारातही माहिती मिळेना!

या कथित अनियमिततेची माहिती सुमारे दोन महिन्यांपूर्वी मिळाल्यानंतर नगर विकास संघर्ष समितीने माहिती अधिकार कायद्यांतर्गत संबंधित व्यवहाराच्या कागदपत्रांची मागणी केली. मात्र, अद्याप माहिती मिळाली नसल्याचा आरोप समितीने केला आहे. त्यानंतर अपील दाखल करण्यात आले. सुनावणीची तारीख दोन वेळा पुढे ढकलण्यात आली, तरीही आवश्यक माहिती उपलब्ध न झाल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

“जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि आर्थिक अनियमितता सिद्ध झाल्यास संपूर्ण रक्कम दोषी व्यक्तीकडून वसूल करावी, या मागणीसाठी समितीचे शिष्टमंडळ लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. ‘जनतेच्या पैशांचा हिशेब जनतेला मिळालाच पाहिजे. दोषींना पाठीशी घालू देणार नाही,’ असा इशारा पाणी पुरवठा सभापती अश्विनी डेकाटे, बबलू सैंय्यद, पुरुषोत्तम पातरे, अनिल न्यायखोर यांच्यासह समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *