उमेदवार राहणार तेच; पण पक्ष चिन्ह पंजा, तुतारी अदला बदलीची चर्चा सुरू !

गोंदिया : – २० नोव्हेंबर रोजी होणारी विधानसभा निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीसाठी तेवढीच प्रतिष्ठेची आहे.ज्या मतदारसंघातून जो उमेद्वार निवडून येण्याची शक्यता अधिक आहे.अशा उमेद्वार प्राधान्य देऊन अधिकाधिक उमेद्वार निवडून आणणे हाच निकष आहे. यावर मित्र पक्षांचेसुध्दा एकमत असल्याची माहिती आहे. त्यामुळे हाच प्रयोग महाविकास आघाडीने तिरोडा व अर्जुनी मोरगाव या मतदारसंघात करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. उमेद्वार तेच पण त्यांचे निवडणूक चिन्ह बदलणार असल्याची माहिती आहे.गोंदिया जिल्ह्यातील चार मतदार संघापैकी गोंदिया, आमगाव आणि अर्जुनी या मतदारसंघावर महाविकास आघाडीत काँग्रेसने दावा केला. घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने सुध्दा तिरोडा आणि अर्जुनी मोरगाव या मतदारसंघावर दावा केला आहे. या दोन्ही ठिकाणाहून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहे. आता त्यांच्या केवळ घोषणेची औपचारिकता बाकी आहे. अर्जुनी मोरगाव मतदारसंघ काँग्रेसकडे असावा यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी तिरोडा आणि अर्जुनी मोरगाव मतदार संघावरील दावा पक्षाने सोडू नये, असा आग्रह धरत आहे.

त्यामुळे यावर मध्यम मार्ग काढण्यासाठी वरिष्ठ पातळीवर महायुतीकडून जुनाच गडी पण नवीन डाव अर्जुनी मोरगाव मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडायचा आणि त्या ठिकाणी काँग्रेसने निश्चित केलेल्या उमेद्वाराला तुतारी चिन्हावर लढायला लावायचे. तर तिरोडा मतदारसंघातून काँग्रेसच्या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ठरविलेल्या उमेदवाराला लढवायचे. यामुळे दोघांचेही समाधान होईल. तिरोडा मतदारसंघात २५ वर्षांनंतर पंजा चिन्ह दिसेल त्यामुळे पदाधिकारी कार्यकर्त्यांचे समाधान होईल, असा मार्ग निघाल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात आहे. अर्जुनी मोरगाव मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला सोडल्यानेत्यांचे सुध्दा समाधान होईल. यासाठी महाविकास आघाडीतअनुकूलता निर्माण करण्याचे प्रयत्न गेल्या आठवडा भरापासून सुरू आहेत.तिरोडा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या नियोजित उमेदवाराने काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास नकार दिल्याची माहिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते यावर काय मध्यम मार्ग काढतात हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.