पाथरीमध्ये तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

दै. लोकजन वृत्तसेवा पालांदूर :- अतिवृष्टी, सततची नापिकी यामुळे भासणारी आर्थिक चणचण, वाढत असलेल्या कर्जाचा डोंगर परिणामी आलेल्या नैराश्यातुन पालांदूर पोलीस ठाणे हद्दीतील पाथरी (ता.लाखनी)येथील एका शेतकऱ्याने स्वत:च्या घराचे पोर्चमध्ये असलेल्या लोखंडी हूकला नायलॉनच्या दोरीने गळफास घेउन जीवन संपविल्याची घटना सोमवारी ३० सप्टेंबर सायंकाळी ७ वाजता उघडकीस आली. किशोर पुरुषोत्तम कोरे (३२ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या तरूण शेतकऱ्याचे नाव आहे. पालांदुर पोलिस ठाण्याचे ठाणेदार सहायक पोलिक निरीक्षक विवेक सोनवाने, सहायक फौजदार कचरु शेंडे यांनी सदरील घटनास्थळी जाऊन पंचनामा करुन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उत्तरीय तपासणी केल्यावर मृतदेह शवविच्छेदनाकरिता लाखनी येथील शवविच्छेदन गृहाकडे पाठविला. मृत किशोर हा आपल्या पत्नी व दोन मुलींसह पाथरी येथे राहत होता. वडिलोपार्जित अडीच एकर जमीन वाहिती करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता. शेतीला जोडधंदा म्हणुन त्याच्याकडे दुग्ध डेअरीचा व्यवसाय देखील होता. मात्र कर्जाचा डोंगर वाढतच असून त्याच्यावर लोकांकडून मागितलेले हातउसने, सोसायटीचे कर्ज देखील असून त्याच्या घरचे सोन्याचे दागिने देखील गहाण असल्याची माहिती आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासुन तो तणावग्रस्त जीवन जगत होता. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विवेक सोनवाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पालांदूर पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार कचरु शेंडे करित आहेत.