विना नंबरच्या अवजड वाहनांकडे भंडारा परिवहन विभागाचे दुर्लक्ष!
दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर शहरातील येथील मुख्य चौकातून दररोज विना नंबरची ३० ते ४० वाहने दिवस-रात्र धावत आहेत. यात प्रामुख्याने हायवा, ट्रॅक्टरचा समावेश आहे. अशा वाहनाने चौकातील वाहतुकीला त्रास तर होत आहेच, परंतु अपघात झाल्यास जबाबदार कोण, परिवहन कार्यालय, महसूल विभाग, पोलिस प्रशासन याकडे लक्ष देणार का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
वेळोवेळी परिवहन विभाग आणि पोलिस विभाग वाहनांची तपासणी करीत असते. तपासणीमध्ये वाहन धारकास कागदपत्र नसणे किंवा वाहतूक नियमांचे उल्लंघन केले म्हणून दंड आकारला जातो. दुचाकीवरून जाताना अशा दंडात्मक कारवाईला वाहनधारकांना सामोरे जावे लागते. परंतु मुख्य चौकातून अनेक विनानंबरची वाहने सर्रासपणे धावत असतात. अशा वाहनांमधून वृक्षतोड केलेली झाडे, रेती, मुरूम, दगड-गोटे, मॅग्नीज व कोळस्याची वाहतूक होते. अशा वाहनांमधून वाहतूक करण्यात येणाऱ्या गौण खनिजाची तपासणी होते, का असाही प्रश्नआहे.