वलमाझरी येथे राज्यस्तरीय ग्रामस्वच्छता समितीचे पाहणी अभियान
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा (सन २०२२-२३) या वर्षातील राज्यस्तरीय तपासणी आज गुरूवारी (१२ जून २०२५) साकोली पंचायत समिती अंतर्गत ग्राम पंचायत वलमाझरी येथे पार पडली. राज्यस्तरीय समिती अध्यक्षांचे प्रतिनिधी तथा पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अवर सचिव मा. श्री अनिल धस, समिती सदस्य सचिव यांचे प्रतिनिधी तथा पाणी पुरवठा विभागाचे कक्ष अधिकारी दूर्गेशब सोनजे, समितीचे सदस्य यांचे प्रतिनिधी तथा पाणी पुरवठा विभागाचे सहायक कक्ष अधिकारी आशितोष पाटील आदींनी तपासणी केली. दरवर्षी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे वतीने संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे आयोजन केले जाते.
त्या अंतर्गत भंडारा जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात जि. प. अध्यक्षा कविता उईके, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे यांचे मार्गदर्शनात स्पर्धेचे आयेाजन केले जाते. आज गुरूवारी पार पडलेल्या राज्यस्तरीय समितीच्या तपासणी प्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व.) माणिक चव्हाण, गट विकास अधिकारी पुंडलिक जाधव, सरपंच पुरूषोत्तम रूखमोडे, उपसरपंच सत्यपाल मरस्कोल्हे, विस्तार अधिकारी (पंचायत) एन.टी. मेढे, ललित कुंभरे, ग्राम पंचायत अधिकारी नरेश शिवणकर, बालविकास प्रकल्प अधिकारी योगिता परसमोडे, उप अभियंता (ग्रा. पा. पु. उप विभाग) हर्षद मेश्राम, जिल्हा कक्षाचे अजय गजापुरे, अशोक बागडे, पोलिस पाटील शंकर कापगते, ग्राम पंचायत पदाधिकारी प्रबुध्द नागदेवे, शोभा कंगाले, बारजा केवट, विश्रांती भलावी, तालुका कक्षाचे निरंजन गणवीर, जनार्धन डोरले, ग्रा. पं. कर्मचारी विनोद कंगाले, गणेश कंगाले, मुकेश कापगते, तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशासेविका आदींची उपस्थिती होती. सर्वप्रथम राज्यस्तरीय तपासणी चमुचे वलमाझरी येथे आगमण होताच, मुख्य प्रवेशद्वारावर सरपंच पुरूषोत्तम रूखमोडे व ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचे कुमकुमतिलक करून व पुष्पगुच्छाने स्वागत केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते मार्ल्यापण करण्यात आले. मुख्य प्रवेशद्वारापासून तर ग्राम पंचायतपर्यंत ढोलतासाच्या गजरात गितगायनाने मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेच्या तपासणीला सुरूवात झाली. सर्वप्रथम वलमाझरी येथे ग्राम पंचायतीने विविध योजनांच्या माध्यमातून राबविलेल्या सार्वजनिक व वैयक्तिकस्तरीय उपक्रमांची पहाणी केली. सर्वप्रथम ग्राम पंचायत इमारतीवरील रेनव्हॉटर हार्वेस्टींग प्रकल्प, शौचालय,. पिण्याचे पाण्याची पहाणी करीत माहिती घेतली. त्यानंतर कचरा वर्गीकरण शेडला भेट दिली. शेडमधील प्लॉस्टीक, काच, ओला व सुका कचऱ्याची पहाणी केली. नाडेप मध्ये ओल्या कचऱ्यापासून तयार होत असलेल्या नाडेप मधील खत प्रक्रियेची पहाणी केली. यावेळी सरपंच रुखमोडे यांनी कचरा संकलन, वर्गीकरणाविषयी माहिती दिली. त्यांनतर गांडूख प्रकल्पाची पहाणी निर्माण होणाऱ्या खताचा उपयोग गावात वृक्षलागवडीकरीता होत असल्याचे सांगितले. त्यानंतर वैयक्तिकस्तरावर कुटूंबाला भेट देऊन शौचालय, पिण्याचे पाणी, गोबरगॅस, नळ जोडणी, वॉटर मिटरबाबत पाहणी केली. तसेच कुटूंबाशी स्वच्छता सुविधा विषयी संवाद साधला. नंतर बंदीस्त गटार व्यवस्था, सार्वजनिक शौषनाली, वैयक्तिक व सार्वजनिक शौषखड्यांची पहाणी केली.
दलित वस्तीतील कुटूंबियाशी त्यांना मिळणाऱ्या योजनांची माहिती जाणून घेतली. अंगणवाडी मध्ये भेट देऊन चिमुकल्यांना उपलब्ध शौचालय, पिण्याचे पाणी, आहार या विषयी पहाणी केली. महिलांकरीता सॅनिटरी नॅपकीन मशिन, इन्सीनेटर विषयी जाणून घेतले. सार्वजनिक विहीरीवरील पाण्याची पातळी पाहिली. कुटूंबियांशी संवाद साधत नळ जोडणी, नळ मिटरची पहाणी केली. ५५ लिटर प्रमाणे पाणी वितरण, नियमित कचरा वर्गीकरण, कचरा वाहन, वैयक्तिकस्तरावर कचरा वर्गीकरण आदींच्या अनुषंगाने कुटूंबियांशी संवाद साधला. ऑरो व गप्पीमासे पैदास केंद्राची पहाणी केली. सार्वजनिक शौचालयाची पहाणी करून वापरात असल्याची खात्री केली. सांडपाण्यावरील वृक्षलागवड पाहिल्यानंतर शाळेला भेट देऊन मुला मुलींकरीता स्वतंत्र स्वच्छता सुविधा, पिण्याचे पाणी, डिजिटल वर्ग खोल्याविषयी मुख्याध्यापक, शिक्षकांशी संवाद साधला. अवर सचिव अनिल धस यांनी, ग्राम पंचायतीच्या विविध योजनांच्या दस्ताऐवजाची ग्राम पंचायत अधिकारी नरेश शिवणकर यांचे कडून तपासणी केली. तसेच ग्राम पंचायत अधिकारी, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती तसेच जलसुरक्षक यांचेशी संवाद साधला. वलमाझरी नंतर पिटेझरी, आमगाव खुर्द, खैरी गावात जावून समितीने पहाणी केली.
बचतगटाचे माध्यमातून उभरलेल्या कापडी पिशव्याच्या लघू उद्योग, शाळा व अंगणवाडी मधील शौचालय, पिण्याचे पाणी, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन, शाळांची स्थिती, नाल्या, कचरा वर्गीकरण शेड, प्लॉस्टीक शेड, सार्वजनिक शौचालय, त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता तसेच कुटूंबांना भेटी देऊन राबवित असलेल्या योजनाविषयी संवाद साधला. वैयक्तिक व सार्वजनिक स्तरावर गावात उभारण्यात आलेल्या विविध सुविधांची पहाणी केली. यावेळी ग्राम पंचात पदाधिकारी तसेच नागरिकांनी ग्राम पंचायतीने राबविलेल्या विविध योजनांची यथोचित माहिती समितीला दिली. ग्राम पंचायत कार्यालयात छोटेखानी कार्यक्रमात ग्राम पंचायतीच्या वतीने तपासणी समिती सदस्यांचे आभार मानून राज्यस्तरीय तपासणी दौऱ्याची सांगता करण्यात आली.