अतिक्रमणधारकाच्या हक्कासाठी वाघमारे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

दै. लोकजन वृत्तसेवा पवनी :- येथील गड किल्ल्याचे लगत असलेले अतिक्रमण काढण्याकरिता प्रशासन सज्ज असलेली तरी अतिक्रमणधारकाच्या हक्काकरिता रस्त्यावर उतरलेल्या विदर्भ युवा क्रांती सघटनेने आक्रमक होऊन तहसील कार्यालयावर मोर्चा काढून आज गुरुवार दि. २२ मे ला दुपारी १२ वाजताचे दरम्यान तहसील परिसरात आत्मदहनाचा प्रयत्न करणारे संघटनेचे संस्थापक हर्षल वाघमारे यांना वेळीच पोलिसांनी अटक करून पुढील होणारा अनर्थ टाळला. पवनी येथील परकोट (किल्ला) परिसरात अनेक दशकापासून अतिक्रमण करून मोलमजुरीतून एक एक पैश्याची बचत करून घराचे बंधकाम केलेल्या १८३ कुटूंबियांना अतिक्रमीत जागा खाली करण्याचे प्रशासनाने नोटीस पाठविले.

याचा परिणाम अतिक्रमणधारकाच्या मनावर पडला असून मानसिक स्वास्थ्य बिघडून आपले घर वाचवण्यासाठी विदर्भ युवा क्रांती संघटनेच्या हाकेला साथ देत मंगळवार दि. २० मे ला तहसील कार्यालयावर मोर्चा काढून शांततेत अतिक्रमण न काढण्यासाठी, त्यावर स्थगिती मिळिवण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन दिवस वाट पाहून सुद्धा प्रशासनाकडून कोणताही स्थगनादेश न मिळाल्याने प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा दिला.

प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची स्थगिती मिळण्याचे कोणती चिन्ह दिसत नसल्याचे पाहून विदर्भ युवा क्रांती संघटनेचे संस्थापक हर्षल वाघमारे यांनी त्या १८३ कुटुंबियांना हाक दिली आणि आज (२२ मे) सकाळपासून तहसील कार्यालय परिसरात प्रत्येक अतिक्रमण धारक आपल्या सोबत एक एक लाकूड आणीत तहसील कार्यालयासमोर जमा केले. प्रशासनाकडून आंदोलनाची कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याचे पाहून संघटनेचे हर्षल वाघमारे व कार्यकर्त्यांनी आणलेल्या लाकडावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टाळल्या गेला. हर्षल वाघमारे सह, निर्देश नंदागवळी, दीपक सिंह टाक, देवराम पवनकर, वैशाली टेंभुरकर, कुंदा शेंडे, कल्याणी आडकीने, सरिता शेंडे यांचेसह शंभराचेवर नागरिकांना अटक करून काही वेळाने सोडण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांचे मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *