मिलिंद तेलतुंबडे याचा अंगरक्षक असलेल्या जहाल माओवादी देवसू चे गोंदिया पोलिसा समोर आत्मसमर्पण
गोंदिया जिल्हा पोलीसांनी आत्मसमर्पण करीता केलेले आवाहन, माओवादी संघटनेतील वरिष्ठ नेत्यांच्या पिळवणूक आणि अत्याचारास कंटाळून, तसेच माओवादी संघटनेतील अतिशय कठीण वेदनामयी जीवनाला कंटाळून ३.५ लाखाचे बक्षिस असलेला जहाल माओवादी देवसू उर्फ देसु (२४) रा. चीटिंगपारा/ गुंडम, जि.- बिजापूर (छ. ग.) पद – सदस्य, यानी १९ मे रोजी जिल्हाधिकारी गोंदिया प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांचे समक्ष आत्मसमर्पण केले आहे. आत्मसमर्पित माओवादी – देवसू उर्फ देसु उर्फ देवा हा नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील गावातील रहिवासी असून त्याचे गावात नक्षल्यांचे नेहमी येणे जाणे होते.
नक्षलवादी जल, जंगल, आणि जमिनीच्या लढाई खाली भोळ्या भाबड्या आदिवासी नागरिकांना सरकार विरुद्ध भडकावून, तथाकथित व खोट्या क्रांती चे कथन करून लोकांना नक्षल चळवळीत ओढण्याचा प्रयत्न करायचे. त्यामुळे लहान पणापासून तो नक्षल्यांच्या विविध प्रलोभन व भूलथापांना बळी पडून नक्षल विचारसरणीशी प्रभावित होऊन बाल संघटन मध्ये रुजू झाला होता.डिसेंबर २०१७ मध्ये त्याला इतर काही नवीन भरती झालेल्या माओवाद्यांसह एम. एम. सी. झोन मध्ये पाठविण्यात आले. नक्षल दलम सोबत १५ दिवस काम केल्यानंतर त्यास तत्कालीन एम. एम.सी. झोन प्रभारी मिलिंद उर्फ दीपक तेलतुंबडे याचे अंगरक्षक म्हणून नेमण्यात आले होते. यांनी १३ नोव्हेंबर २०१२ रोजी मर्दिनटोला, जि. गडचिरोली येथे नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत मिलिंद तेलतुंबडे याचेसह एकूण २८ नक्षलवादी मारले गेलेत. सदर चकमकीतून माओवादी देवसु व त्याचे काही साथीदार जीव वाचवून पळून गेले. सदर माओवादी देवसू उर्फ देसू उर्फ देवा याने वर्ष २०१७ ते २०२२ मध्ये माओवादी संघटनेत कार्यरत असताना गोंदिया जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात घडलेल्या विविध गुन्ह्यात सहभागी असल्याचे कबूल केले आहे.
राजनांदगाव, सध्या खैरागड / छत्तीसगड) अंतर्गत तांडा जंगल परिसरात पोलिस माओवादी चकमकीत सहभागी. कान्हा भोरमदेव एरिया जंगल परिसरात पोलिस माओवादी चकमकीत सहभागी. मर्दीनटोला ( गडचिरोली) जंगल परिसरात पोलिस माओवादी चकमकीत सहभागी. देवसु याचे आत्मसमर्पीत होण्याची महत्वाची कारणे देत सांगितले की, १३ नोव्हेंबर २०२१ रोजी मर्दिनटोला येथे झालेल्या चकमकीत दीपक तेलतुंबडे याला माझ्यासमोर गोळी लागली व तो मरण पावला. त्यावेळी काही जण तिथून जीव वाचवून पळून गेले. तेव्हापासून मला मृत्यूची व अटकेची सारखी भीती वाटत होती असे देवसु म्हणाला… पोलीस दलाच्या सततच्या नक्षल विरोधी अभियानामुळे जंगलातील वावर धोकादायक झाले आहे. पोलिसांची सारखी भीती वाटते. वरिष्ठ कॅडर हे पोलीस खबरी असल्याच्या संशयावरुन निरपराध आदिवासी बांधव/ सामान्य नागरीकांना ठार मारायला सांगतात. हे कदापी संयुक्तिक वाटत नाही. त्यामुळे देवसू नी महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण योजनेने प्रभावित होऊन समर्पण करण्याचा निर्णय घेतला. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे, आणि अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा, यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडली आहे.