विदर्भवासीयांच्या अयोध्या यात्रेसाठी दिलासा?
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत यादवरावजी पडोळे यांनी नागपूरपासून अयोध्या धामापर्यंत थेट रेल्वेसेवा सुरु करण्याची जोरदार मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना त्यांनी यासंदर्भात अधिकृत निवेदन पाठवले आहे. या निवेदनात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीरामांचे अयोध्या धामात भव्य मंदिर उभे राहिले आहे. परंतु आजही नागपूरसारख्या मध्यवर्ती शहरातून अयोध्येपर्यंत गोंदिया, जबलपूर व प्रयागराज मार्गे एकही थेट रेल्वेसेवा उपलब्ध नाही. विदर्भातील लाखो श्रद्धाळूंना प्रभू रामललांचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. डॉ. पडोळे यांनी आपल्या पत्रात रेल्वेमार्गाच्या संभाव्य सामाजिक व धार्मिक महत्त्वावर भर दिला असून असे नमूद केले आहे की, “हे मार्ग फक्त मालवाहतुकीसाठी नाहीत, तर विदर्भातील नागरिक व येथे वास्तव्य करणाऱ्या उत्तर भारतीयांसाठीही हे अत्यंत गरजेचे आहे.
सध्या देशातील विविध प्रमुख शहरांमधून अयोध्येसाठी नियमित रेल्वेसेवा उपलब्ध असूनसुद्धा, नागपूरसारख्या महत्त्वाच्या केंद्रातून अशी कोणतीही थेट सेवा नसल्याचे त्यांनी हायलाईट केले आहे. “हे क्षेत्र धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू शकते, शिवाय स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असे ते म्हणाले. रेल्वे मंत्रालयाकडून या निवेदनावर काय पावले उचलली जातात, याकडे आता संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे. श्रद्धा, सामाजिक गरज आणि लोकप्रतिनिधीची भूमिका या तिन्हींचा संगम असलेली ही मागणी लवकरच फळाला येईल, अशी अपेक्षा विदर्भवासीय व्यक्त करत आहेत.