मुलीच्या जन्माला ११००, कन्यादानाला ११००, अंत्यसंस्कारासाठी कुटुंबाला १५०० रुपयांची आर्थिक मदत..

गोंदिया:- वर्ष १९९२ मध्ये संविधानात ७३ दुरुस्त्या करण्यात आल्या.त्या दुरुस्तीने ग्रामपंचायतींना अमर्याद अधिकार दिले.यातून ग्रामपंचायत स्वतःच्या स्रोतातून उत्पन्न मिळवते आणि स्वतःच्या खर्चाचे नियोजन करते. गोरेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मोहाडी ग्रामपंचायतीने शासनाच्या अनुदाना शिवाय बरेच सामाजिक उपक्रम चालवले आहेत. यामध्ये गावातील कोणत्याही मुलीच्या जन्माच्या आणि कन्यादान म्हणून ११०० रुपये दिले जातात. कोणत्याही घरात मुलगी जन्माला आल्यावर तिच्या आईचा गणतंत्र दिवस २६ जानेवारी आणि स्वातंत्र दिवस १५ ऑगस्ट रोजी ग्राम पंचायतीत आयोजित झेंडा वंदन कार्यक्रमा नंतर सन्मान केला जातो आणि ११०० रुपये दिले जातात. या शिवाय गावातील कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंत्य संस्कारा साठी त्या कुटुंबाला तात्काळ १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

ही सर्व रक्कम ग्रामपंचायत स्वतःच्या स्रोतातून मिळणाऱ्या उत्पन्नातून देते. याशिवाय पोळा सणात शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट बैलजोडी सजावटीसाठी संबंधित शेतकऱ्याला ग्रामपंचायतीकडून २१०० रुपये बक्षीस म्हणून दिले जातात.यासाठी शासनाचे कोणतेही अनुदान ग्रामपंचायतींना मिळत नाही. मोहाडी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाने प्रेरित होऊन जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायतीही असाच उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. मोहाडी ग्रामपंचायतीने मोडकळीस आलेल्या गावाजवळील मोक्षधामला नवनिर्माण करूननवसंजीवनी दिली. आणि तिथं स्वच्छते बरोबरच पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना पर्यावरणपूरक वातावरण मिळावे यासाठी संपूण संकुलात झाडे लावून परिसर हिरवेगार करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *