मोहाडी तालुक्यातील मग्रारोह योजनेच्या २७ कामाची होणार चौकशी
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- महाराष्ट्र रोजगार हमी योजने अंतर्गत पांदन रस्ते खडीकरणाचे काम मजुराद्वारे न करता ते काम बोगस मजुराद्वारे करण्यात आल्याची तक्रार मोहाडीचे तहसीलदार यांचेकडे केली आहे. त्यामुळे मंजूर ९४१ कामांपैकी २७ कामांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामुळे संबंधित काम करणाऱ्या कंत्राटदाराचे धाबे दणाणले आहे. सविस्तर असे की, मोहाडी तालुक्यात पांदन रस्ते खडीकरण करण्याचे ९४१ कामांना मंजुरी देण्यात आली. त्यानुसार अनेक गावांत पांदन रस्ते खडीकरण करण्याचे काम करण्यात आले तर काही ठिकाणी काम सुरू आहेत. यामध्ये २२ लक्ष रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले असून १३ लक्ष रुपये अकुशल कामावर खर्च करायचे आहे तर ८.५० लक्ष रुपये कुशल कामावर खर्च करायचे आहे. मात्र तालुक्यात अनेक गावांत माती काम करण्यात आले नाही.
बोगस हजेरी दाखवून एक प्रकारे शासनाच्या निधीची अफरातफर करण्याचा काम सुरू आहे. त्यामुळे अनेक गावांत तक्रारी दाखल झाल्या आहेत त्यानुसार तालुक्यातील २७ कामाची चौकशी करण्यात येणार आहे. यामध्ये माती काम करण्यात आले नाही. त्यामुळे मजुरांवर झालेला खर्च चुकीच्या पद्धतीने झाला आहे. माती काम न करताच मुरूम टाकून गिट्टी दबाई करण्यात आली त्यामुळे माती कामाचे देयके थांबविण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. ज्या २७ कामाची तक्रार झाली आहे त्यामध्ये हरदोली झं., टाकला, सालेबर्डी, कुशारी, मोहगाव देवी, भिकारखेडा, धोप अकोला येतील २७ कामाची तक्रार झाली असून चौकशी लागली आहे.
मात्र या सगळ्या कामात एक गोष्ट कामन आहे ती म्हणजे मजुराव्दारे माती काम करण्यात आले नाही. हजेरी घेण्यात आली मात्र प्रत्यक्षात माती काम झाले नाही. त्यामुळे शासनाने मोहाडी तालुक्यातील पांदन रस्ते खडीकरण कामाचे देयके देऊच नये अशी मागणी तक्रारदार यांनी केली असल्याने चुकीच्या पद्धतीने काम केलेल्या कंत्राटदाराचे धाबे दणाणले आहेत. तसेच मंत्रालयाव्दारे या कामाची चौकशी केल्यास या मध्ये मोठे मासे गळाला लागतील हे मात्र निश्चित. खरोखरच तक्रारदार यांच्या समोर चौकशी होईल की चौकशी अधिकारी यांचे हात ओले होतील हे वेळच ठरवणार आहे. झालेल्या तक्रारीमुळे तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे यामध्ये कोणाची विकेट पडेल हे चौकशी अंती समोर येईल.