पोलिस भर्तीचे स्वप्न भंगले, वर्दीऐवजी अंगावर चढले शववस्त्र
आमगाव:- आमगाव तालुक्यातील पोकरटोला गावात धक्कादायक घटना घडली आहे. इथं पोलीस भरती करणाऱ्या दोन जीवलग मित्राच्या करुण अंत झाला आहे. यातील एका तरुणाने तर पोलीस भरतीची लेखी परीक्षा उत्तीर्ण केली होती. खाकीचं स्वप्नं काही पावलं दूर होतं, तोपर्यंतचं काळाने त्याच्यावर झडप मारली. त्यामुळे तरुणावर वर्दी ऐवजी शववस्त्र चढली.दोन मित्रांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे. कृष्णकुमार पारधी (१९) आणि शुभम कांबळे (२०) असं मय्यत झालेल्या दोन्ही तरुणांची नावं आहेत. दोघेही मागील काही काळापासून पोलीस भरतीची तयारी करत होते. त्यासाठी ते दररोज सकाळी लवकर उठून सरावासाठी जात होते. पण रविवारी सकाळी दोघांचा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वाघ नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.
ही घटना गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील पोकरटोला येथील आहे. प्राप्त माहितीनुसार, दररोज पोलिस भरतीच्या सरावासाठी रविवारी सकाळी शुभम आणि कृष्णकुमार या दोघांनी लवकर उठून धावण्याच्या सराव केला. यानंतर दोघंही नदीच्या पाण्यात अंघोळीसाठी गेले होते. दरम्यान त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. शोध पथकाला ही दोन्ही मृतदेह गवसली.