तुमसरात इलेक्ट्रिक बस चार्जिंग स्टेशन सुरू करा
शिवसेना (उबाठा) चे विभाग नियंत्रकांना निवेदन
दै. लोकजन वृत्तसेवा
तुमसर : भंडारा जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असलेल्या तुमसर शहरात इलेक्ट्रिक बससाठी स्वतंत्र चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
तुमसर शहर हे कुबेर नगरी तसेच राईस सिटी म्हणून ओळखले जाते. मात्र, शहरातून सुरू असलेल्या इलेक्ट्रिक बससेवेसाठी चार्जिंग स्टेशनची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे बसला चार्जिंगसाठी भंडारा येथे जावे लागते. त्यानंतर ही बस भंडारा येथून नागपूरकडे रवाना होते. तुमसरसारख्या महत्त्वाच्या शहरात चार्जिंग स्टेशन नसणे ही खेदजनक बाब असून, शहरातच चार्जिंग पॉईंट उभारण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
चार्जिंग स्टेशन सुरू झाल्यास इलेक्ट्रिक बससेवा अधिक सुरळीत होईल, बसचा अनावश्यक प्रवास व वेळ वाचेल, प्रवाशांना वेळेवर सेवा मिळेल तसेच भविष्यात तुमसरमधून नवीन इलेक्ट्रिक बसफेऱ्या सुरू करण्यास मदत होईल. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागाच्या विभाग नियंत्रकांकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
विभाग नियंत्रकाशी चर्चा करताना सुधाकर कारेमोरे व इतर
यावेळी सुधाकर कारेमोरे (जिल्हा समन्वयक), प्रकाश पारधी (उपजिल्हा प्रमुख), ईश्वर भोयर (तालुका प्रमुख), प्रवीण गुमा (शहर प्रमुख), संजय झांझाड (वाहतूक सेना उपजिल्हा प्रमुख), पवन खवास (युवासेना तालुकाप्रमुख), सत्यनारायण कामथे (उपत तालुकाप्रमुख), दिग्रस खडसे (विभाग प्रमुख), जगन ताडेकर (उपविभाग प्रमुख), कृष्णा रहांगडाले (विभाग प्रमुख), शैलेश शेंद्रे (विभाग प्रमुख), रोहित बागडे, आशिष मोहनकर, गिरधारी पटले, विशाल मेश्राम, अक्षय ठवकर तसेच तुमसर शहर व ग्रामीण भागातील अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






