छत्तीसगड मधील सुकमा येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात “आयपीएस’ आकाश राव गिरीपुंजे शहीद…

गोंदिया :- सोमवार ९ जून रोजी सकाळी ११ वाजता नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात नागपूरचे सुपुत्र “आयपीएस’ अधिकारी आकाश राव गिरीपुंजे (४६) हे शहीद झाले. या हल्ल्यात इतर काही अधिकारी व पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. गिरीपुंजे हे सुकमा जिल्ह्याच्या कोटा विभागात अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा यंत्रणांनी सुरू केलेल्या आक्रमक कारवाई दरम्यान २१ मे रोजी नक्षल्यांचा सर्वोच्च नेता व भारतीत कम्युनिस्ट पार्टीचा (माओवादी) महासचिव नंबाला केशव राव उर्फ बसवा राजू याचा सुरक्षा जवानांनी चकमकीत खात्मा केला होता. या चकमकीत एकूण २७ नक्षलवादी ठार झाले होते.

दरम्यान, बसवा राजूच्या स्मरणार्थ व सरकारच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती उर्फ अभय याने १० जून रोजी भारत बंदचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर सुकमा जिल्ह्यात ९ जून रोजी सकाळी नक्षलवादविरोधी अभियान राबविण्यात येत होते. या मोहिमेत कोंटा विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक आकाश राव गिरीपुंजे हे स्वत: जवानांसोबत पायदळ गस्तीसाठी रस्त्यावर उतरले होते. कोंटा-एर्राबोर मार्गावरील डोंड्रा गावाजवळ नक्षलवाद्यांनी आधीच सापळा रचून ठेवलेला होता. रस्त्याच्या खोल भागात लपवलेला स्फोटक सापळा गस्ती दरम्यान अचानक उडवण्यात आला. स्फोट इतका जबरदस्त होता की,अतिरिक्त अधिक्षक गिरीपुंजे यांना वाचवण्याची संधीच मिळाली नाही. कोंटाचे ठाणेप्रमुख व आणखी काही जवान जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *