एकाच दिवशी बोंडे येथे अवैध रेती वाहतुकीचे दोन ट्रॅक्टर जप्त
१६ लाख १२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत एलसीबीची धडक कारवाई
दें. लोकजन वृत्तसेवा
भंडारा : करडी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेती वाहतूक राजरोस सुरू असताना करडी पोलिसांकडून मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून होत आहे. याचाच प्रत्यय आज दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी आला. करडी पोलिसांना दिसत नसलेली अवैध रेती वाहतूक, स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) भंडारा येथील उपविभाग भंडारा पथकाने एकाच दिवशी दोन ठिकाणी रेड करून उघडकीस आणली. दोन ट्रॅक्टरसह एकूण १६ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पहिली कारवाई – एलसीबी पथकाने मौजा बोंडे गाव येथे रेड केली. आरोपी शामराव तीमाजी पिंगळे, वय ३८, रा. बोरगाव, ता. मोहाडी हा निळ्या रंगाच्या स्वराज ७३५ एफ.ई. ट्रॅक्टर क्र. एम.एच. ३६ ए.एल. ५३६७ मध्ये ट्रॉलीमध्ये ०१ ब्रास रेती विना पास-परवाना वाहतूक करतानाळून आला.
दुसरी कारवाई – त्याच दिवशी दुसऱ्या कारवाईत बोंडे ते खडकी रोड येथे आरोपी महेश प्रभू घोनमोडे, वय ३३, रा. कान्हळगाव, ता. मोहाडी हा निळ्या रंगाच्या स्वराज ७३५ एफ. ई. विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये ट्रॉलीमध्ये ०१ ब्रास रेती विना पास-परवाना वाहतूक करतानाळून आला.
ही तर करडी पोलिसांची नामुष्की
या दोन्ही कारवाया एलसीबीने केल्याने करडी पोलीस स्टेशनच्या कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. करडी हद्दीत रोज अवैध रेतीचे ट्रॅक्टर धावतात, हे करडी पोलिसांना दिसत नाही का? बाहेरून एलसीबी येऊन कारवाई करते, तेव्हाच गुन्हे दाखल होतात. मग करडी पोलीस करतात तरी काय? हा निष्काळजीपणा आहे की अर्थपूर्ण दुर्लक्ष?
एलसीबीला कारवाईसाठी यावे लागते, याचा अर्थ स्थानीय पातळीवर देखरेखीचा पूर्ण अभाव आहे, असा आरोप होत आहे. या प्रकारामुळे रेती माफियांचे मनोबल वाढून शासनाच्या महसुलाचेही मोठे नुकसान होत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याची गंभीर दखल घेऊन करडी पोलीस स्टेशनच्या निष्काळजीपणाची चौकशी करावी आणि अवैध रेती वाहतुकीला कायमचा आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.
याप्रकरणी पो.स्टे. करडी येथे अप क्र. २१२/२०२६ कलम ३०३(ई), भा.न्या.सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. दोन्हीमध्ये १६ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.







