तिरी गावात अखेर बिबट जेरबंद

चिमुकल्याचा जीव गेलेल्या ठिकाणापासून ३५० मीटरवर पिंजऱ्यात अडकसला

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा : पवनी तालुक्यातील तिरी गावात स्वयंपाक घरात शिरून सहा महिन्याच्या बालकाला उचलून नेत बिबट्याने ठार केल्याच्या घटनेने संपूर्ण भंडारा जिल्हा हादरला होता. या घटेननंतर तिरी गाव आणि परिसरात प्रचंड दशहतीचे वातावरण होते. अखेर वनविभागाला तीन दिवसांच्या अथक प्रयत्ननंतर यश असून १६ नोव्हेंबरच्या रात्री एक बिबट वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाला आहे.

अडथळ वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या जंगल व्याप्त तिरी या गावातील अभिमान बोन्द्रे यांच्या घरात शिरून १४ नोव्हेंबरच्या रात्री एका बिबट्याने घरातील सदस्यांच्या डोळ्यादेखत स्वयंपाक घरातून अद्वैत या सहा महिन्याच्या बाळाला पळविले होते. या हल्ल्यात अद्वैतचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. वनविभागाने त्यावेळी परिस्थिती नीट हाताळून पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. घटना घडली तेव्हापासूनच वनविभागाच्या वेगवेगळ्या पथकांकडून बिबट्याचा शोध घेणे सुरू झाले. अडथाळ, पवनी, भंडारा, नवेगाव नागझिरा येथील विशेष बचाव पथकाच्या माध्यमातून मागील तीन दिवसांपासून शोध मोहीम राबवली जात होती. जवळपास १२ ते १३ ठिकाणी पिंजरे बसविण्यात आले. लाईव्ह कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातून जंगल पिंजून काढण्यात आले.

 अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस बिबट जेरबंद व्हावा यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. अखेर आज पहाटे एक पथक गस्ताविर असताना त्यांना एका पिंजऱ्यात बिबट अडकल्याचे दिसले. ज्या ठिकाणी बाळाला ठार केले त्यापासून अवघ्या ३५० ते ४०० मीटरवर असलेल्या पिंजऱ्यात बिबट अडकल्याने हा तोच बिबट असा अंदाज बांधला जात आहे, मात्र त्याची खात्री झालेली नाही. नर असलेला हा बिबट १८ ते २० महिन्याचा असल्याचा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.

ताबा्यात आलेल्या बिबट्याला नागपूर येथील प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र्रत पाठविण्यात आले आहे. बिबट जेरबंद झाल्याने तिरी गावातील नागरिकांनी काहीसा दिलासा मिळाला असला तरी भीतीचे वलय अजून कायम आहे. मात्र घटनेनंतर असलेला आक्रोश बऱ्याच अंशी कमी झाला आहे. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, सोबतच ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे बिबट फडकण्यात यश आले. आता हा तोच बिबट आहे का? याची खात्री काही तपासण्या झाल्यानंतरच होईल. या अभियानामध्ये सर्व कर्मचाऱ्यांची जीव ओतून योगदान दिले. ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी घेतलेल्या सामूहिक प्रयत्नातून हे शक्य झाले. गावकऱ्यांना वन्य धोका होवू नये म्हणून काळजी घेण्याच्या दृष्टीने आमचे सर्व प्रयत्न अजूनही सुरू असल्याचे सहायक वनसंरक्षक सचिन निलख यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *