वैनगंगेच्या तीरावर एअर होस्टेस वर्षा तुरकरची निर्घृण हत्या! मित्रासोबत फिरायला गेली अन् रक्ताच्या थारोळ्यात आढळली
लुटमारीच्या कथनावर संशय, नितेश अग्रवालसह पतीच्या भूमिकेचीही पोलिसांकडून पडताळणी
दै. लोकजन वृत्तसेवा
गोंदिया :- पुणे येथे इंडिगो एअरलाईन्समध्ये एअर होस्टेस म्हणून कार्यरत असलेल्या वर्षा तुरकर (३५) हिच्या संशयास्पद हत्येने गोंदिया आणि बालाघाट परिसरात खळबळ उडाली आहे. दवनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोंडरानी (अर्जुनी) येथील वैनगंगा नदीकाठच्या जंगल परिसरात १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी तिच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वर्षाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या प्रकरणातील लुटमारीच्या कथनाभोवती संशयाचे धुके निर्माण झाले असून, गोंदियातील नितेश अग्रवाल याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
प्राप्त माहितीनुसार, दिवाळीनिमित्त वर्षा आपल्या ३ वर्षीय मुलीसह मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील खैरी या माहेरी आली होती. १४ नोव्हेंबरला सायंकाळी सातच्या सुमारास ती तिचा जुना परिचित नितेश अग्रवाल याच्यासोबत फिरण्यासाठी वैनगंगा नदीकाठी गेली होती. काही वेळानंतर नितेशने वर्षाच्या कुटुंबीयांना फोन करून अज्ञातांनी लुटमार करत वर्षावर चाकूने हल्ला केल्याचे सांगितले. घटनास्थळी पोहोचलेल्या नातेवाईकांना वर्षा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिला खैरलांजी येथील रुग्णालयात नेण्यात आले; मात्र सायंकाळी सातच्या सुमारास डॉक्टरांनी मृत घोषित केले.
लुटमारीच्या कथनाभोवती संशयाचे वलय
या घटनेत नितेशला कोणतीही दुखापत झाली नसल्याची बाब तपासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आहे. हल्लेखोरांनी केवल वर्षालाच लक्ष्य का केले? लुटमारीचा प्रयत्न झाला असेल, तर नितेश सुरक्षित कसा राहिला? हल्लेखोरांची संख्या, घटनास्थळावरील परिस्थिती आणि हत्येसाठी वापरलेले शस्त्र बाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. नितेशच्या जबाबाची सत्यता पडताळण्याबरोबरच मृताच्या पती समर सैयद याच्याकडेही चौकशीच्या अनुषंगाने लक्ष दिले जात असल्याची माहिती आहे. मात्र, कोणाचाही गुन्ह्यातील सहभाग अद्याप सिद्ध झालेला नाही.
प्रेमविवाहानंतर पुण्यात संसार
वर्ष २०२१ मध्ये समर सैयद याच्याशी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर ती पतीसोबत पुण्यात वास्तव्यास होती. दोघेही विमानसेवा क्षेत्रात कार्यरत असल्याची माहिती आहे. तिला तीन वर्षांची मुलगी आहे. तिच्या वडिलांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
घटनेचे ठिकाण महाराष्ट्रातील दवनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने बालाघाट जिल्ह्यातील खैरलांजी पोलिसांनी आवश्यक पंचनामा व शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करून संबंधित कागदपत्रे महाराष्ट्र पोलिसांकडे १५ नोव्हेंबर रोजी सुपूर्द केली आहेत. दवनीवाडा पोलीस निरीक्षक प्रशांत भुते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
अनेक अनुत्तरित प्रश्न; तपासाकडे लक्ष
या हत्येमागील नेमके कारण काय, लुटमारीचे कथन खरे आहे की त्यामागे वेगळेच कारण दडले आहे, हल्लेखोर कोण आणि हत्येत कोणाचा सहभाग आहे, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. घटनास्थळावरील पुरावे, संशयितांचे जबाब आणि तांत्रिक तपासातूनच या गूढ हत्येचा उलगडा होऊ शकणार आहे. एका चिमुकल्याच्या डोक्यावरील मातृछत्र हिरावणाऱ्या या घटनेत वर्षाला न्याय मिळवून देण्याचे आव्हान आता दवनीवाडा पोलिसांसमोर आहे.







