पहिल्या फेरीत काँग्रेसचे अभिजित वंजारी ७ हजार मतांनी आघाडीवर

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक

दै. लोकजन वृत्तसेवा

भंडारा :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीत मोठी अपडेट समोर आली आहे. पहिल्या पसंतीच्या सुमारे ८४ हजार मतांची मोजणी पूर्ण झाली असून यात काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजित वंजारी हे भाजपचे सुधाकर कोहळे यांच्यापेक्षा जवळपास ७ हजार मतांनी आघाडीवर आहेत. अध्याप सुमारे ८० हजार मतांची मोजणी शिल्लक आहे.

मानकापूर क्रीडा संकुलात सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या मतमोजणीत एकूण ८४ टेबलवर २५-२५ मतपत्रिकांच्या गड्यामांनुसार मोजणी सुरू आहे. एकूण १ लाख ६५ हजार ६७२ मतदानापैकी सुमारे ६ हजार ६२१ गट्टे तयार करण्यात आले होते. त्यापैकी निम्म्याहून अधिक मतांची मोजणी पूर्ण झाली.

ुरुवातीच्या टपाली मतांमध्येही वंजारी यांनी आघाडी घेतली होती. २३८ टपाली मतपत्रिकांपैकी ३४ अवैध ठरल्या होत्या. वैध २०४ मतांमध्ये वंजारी यांना १०१, तर कोहळे यांना ८६ मते मिळाली होती. त्यानंतर प्रत्यक्ष मतमोजणीतही वंजारी यांनी आघाडी कायम ठेवत फरक ७ हजारांपर्यंत नेला आहे.

या निवडणुकीत एकूण ३८ उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत वंजारी विरुद्ध कोहळे यांच्यातच आहे. २०२० मध्ये सहा दशकांचे भाजपचे वर्चस्व मोडून काढत वंजारी विजयी झाले होते. त्यामुळे ही जागा परत मिळवण्यासाठी आपने पूर्ण ताकद पणाला लावली आहे. मात्र पहिल्या फेरीतली आकडेवारी काँग्रेसच्या बाजूने झुकताना दिसत आहे.

दरम्यान दोन्ही छावण्यांकडून विजयाचे दावे सुरू आहेत. भाजपचे सुधाकर कोहळे यांनी ५० हजारच्या फरकाने विजयाचा दावा केला होता, तर वंजारी यांनी २५ हजार मताधिक्याचा विश्वास व्यक्त केला होता. अपक्ष उमेदवार नितेश कराळे यांनीही दुसऱ्या पसंतीत विजयाचा दावा केला आहे.

निवडणूक पसंतीक्र म पद्धतीने होत असल्याने वैध मतांवरून विजयाचा कोटा निश्चित केला जाणार आहे. अवैध मतांचे प्रमाण लक्षात घेता कोटाचे गणित बदलू शकते. जर पहिल्या पसंतीत कोणीही कोटा पूर्ण करू शकले नाही, तर दुसऱ्या, तिसऱ्या पसंतीची मोजणी होणार आहे. त्यामुळे उर्वरित ८० हजार मतांची मोजणी निर्णायक ठरणार असून अंतिम निकाल मध्यरात्रीनंतर लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *