अल्पवयीन मित्रानेच घेतला शाळकरी मुलाचा जीव

भंडण्यात खळबळ, संतप्त नातेवाईकांचा पोलीस ठाण्याला घेराव

शहरातील दीड महिन्यातील तिसरी, आठवड्यातील दुसरी घटना

दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा: शांत आणि सुरक्षित शहर अशी ओळख असलेल्या भंडारा शहरात गेल्या काही दिवसांपासून घडणाऱ्या गंभीर गुन्हेगारी घटनांनी शहराच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मंगळवारी (१८ ऑगस्ट) सायंकाळी साडे पाचच्या सुमारास मेंढा परिसरातील नेहरू गार्डनजवळ एका अल्पवयीन शाळकरी मुलाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. अंश गजानन येरकडे (१६) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. विशेष म्हणजे या हत्येतील संशयितही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे.

अंश हा भागीरथ भास्कर शाळेत नववीच्या वर्गात शिकत होता. शाळा सुटल्यानंतर तो घरी परतत असताना घराजवळच ही घटना घडल्याचे समजते. घटनास्थळी त्याचे दमर पडलेले आढळून आले. त्यामुळे काही वेळातच परिसरात एकच खळबळ उडाली.

माहितीनुसार, अंश आणि संशयित अल्पवयीन मुलगा मित्र होते. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता. मंगळवारी दोघे भेटून चर्चा करीत असताना पुन्हा वाद झाला. यावेळी अंशकडे असलेल्या गुमीवरून झटापट झाली. गुमी हिसकावून घेत संशयिताने अंशवर वार केल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेनंतर अंशच्या कुटुंबांसह परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. संतप्त नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेत संशयिताला त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी केली. यावेळी काही काळ पोलीस ठाण्याच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दरम्यान, गेल्या दीड महिन्यात भंडारा शहरात हत्येची ही तिसरी घटना असल्याचा दावा नागरिकांकडून केला जात आहे. काही दिवसांपूर्वी विघ्नहर्ता हॉटेलसमोर भरदिवसा झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने शहर हादरले होते. त्यापूर्वी अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या घटनेनेही संताप व्यक्त झाला होता. या घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा-सुव्यवस्थेबाबत नागरिकांकडून गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

शहरात अमली पदार्थांची विक्री वाढत असल्याचा आरोपही काही नागरिकांनी केला असून, वाढत्या गुन्हेगारीवर पोलिसांनी कठोर अंकुश ठेवण्याची मागणी होत आहे. सलग घडणाऱ्या गंभीर घटनांमुळे ‘भंडारा सुरक्षित आहे तरी कुठे?’ असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *