एअर होस्टेस वर्षा तुरकर हत्याकांडाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून उलगडा; पत्नीनेच रचला पतीच्या मैत्रिणीच्या हत्येचा कट
१३ लाखांची दिली सुपारी! जीपीएस लोकेशनच्या आधारे जंगलात नेऊन निर्घृण हत्या, पत्नी, सूत्रधारासह चौघे ताब्यात; दोघांचा शोध सुरू
दै. लोकजन वृत्तसेवा
गोंदिया :- संपूर्ण जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या वर्षा तुरकर हत्याकांडाचे गूढ अखेर उकलण्यात गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पतीचे दुसऱ्या महिलेशी असलेले प्रेमसंबंध असह्य झाल्याने पत्नीनेच संबंधित महिलेच्या हत्येचा कट रचल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली आहे. या हत्येसाठी तब्बल १३ लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती. जीपीएस लोकेशनच्या आधारे पाठलाग करून जंगलात गाठत वर्षा यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी पतीची पत्नी, सुपारी घेणारा आणि अन्य दोघांसह चौघांना ताब्यात घेण्यात आले असून, आणखी दोघे फरार आहेत अशी माहिती गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी बुधवार १८ नोव्हेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय सभागृहात घेण्यात आलेल्या पत्र परिषदेत दिली.
बालाघाट जिल्ह्यातील खैरलांजी तालुक्यातील किन्ही येथील माहेरी दिवाळीच्या सुट्टीसाठी आलेल्या वर्षा तुरकर (३५, रा. धानोरी, पुणे) या १४ नोव्हेंबर रोजी गोंदियातील मित्र नितेश अग्रवाल याच्यासोबत तिरोडा येथे गेल्या होत्या. परतताना बोंडराणी येथील शिवमंदिराजवळील जंगल परिसरात थांबले असता, मोटरसायकलवरून आलेल्या तिघांनी वर्षा यांच्या पोटावर व पाठीवर चाकूने वार करून त्यांची हत्या केली होती. याप्रकरणी दवनीवाडा पोलीस ठाण्यात १५ नोव्हेंबरला खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तपासाच्या सूचना दिल्या. पोलीस निरीक्षक रवीचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वाखाली सहा पथके तयार करण्यात आली. गोंदिया, तिरोडा, खैरलांजी, वारासिवनी आणि बालाघाट या मार्गावरील सुमारे २०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासण्यात आले. त्यातून नितेश यांच्या वाहनाचा तीन संशयित मोटरसायकलस्वार पाठलाग करीत असल्याचे स्पष्ट झाले.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी १९ नोव्हेंबर रोजी मुर्री येथून इमरान करीम शेख याला ताब्यात घेतले. चौकशीत नितेश यांच्या पत्नीने घराजवळील कुणाल कुंभलकर याच्या मदतीने कट रचल्याचे समोर आले. सराईत गुन्हेगार शाहरुख पठाण याच्यामार्फत १३ लाखांची सुपारी देण्यात आली होती. त्यानंतर इमरान शेख, नायलांन उर्फ नलेन शेख आणि क्रिस राऊत यांच्यावर हत्येची जबाबदारी सोपविण्यात आली. नितेश यांच्या पत्नीच्या नावावरील कारमधील टोयोटा आय-कनेक्ट प्रणालीचे आयडी आणि पासवर्ड आरोपींना उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यामुळे जीपीएसच्या माध्यमातून वाहनाचे लोकेशन मिळवून आरोपींनी वर्षा यांच्यापर्यंत पोहोचत हत्या केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी चौघांना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी दवनीवाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आणखी दोन आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व सायबर पथकाने ही कारवाई केली.





