मेडिकल कॉलेज झाले, पण रुग्णांना औषधांसाठी बाहेरचा रस्ता!

भंडारा शासकीय रुग्णालयातील सुविधांवर प्रश्नचिन्ह

दें. लोकजन वृत्तसेवा

भंडारा : सर्वसामान्य आणि गरीब रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने भंडारा येथील सामान्य रुग्णालयाचे रूपांतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात करण्यात आले. मात्र, महाविद्यालयाचा दर्जा मिळाल्यानंतरही रुग्णांच्या अडचणी कायम असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतरही काही आवश्यक औषधे रुग्णालयातून मिळत नसल्याने ती बाहेरच्या मेडिकल स्टोअरमधून खरेदी करावी लागत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. त्यामुळे शासनाच्या मोफत आरोग्यसेवेचा लाभ प्रत्यक्षात कितपत मिळतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागासाठी २० रुपयांचे नोंदणी शुल्क भरून रुन उपचारासाठी येतात. मात्र, डॉक्टरांनी लिहून दिलेली सर्वच औषधे रुग्णालयातून मिळत नसल्याची तक्रार काही रुग्णांनी केली आहे. औषधांसोबतच आवश्यक वैद्यकीय साहित्य मिळण्याबाबतही रुग्नांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या रुग्णांना औषधांसाठी पुन्हा बाहेर पैसे खर्च करावे लागत असल्याने त्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत आहे.

विशेष म्हणजे, रुग्णांच्या तक्रारी आणि प्रशासनाचा दावा यामध्ये विसंगती दिसून येत आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता सुजाता दुधगावकर यांनी रुग्णालयात औषधाचा योग्य साठा असल्याचे स्पष्ट केले आहे. काही औषधांचा दोन-चार दिवस तुटवडा निर्माण झाला तरी त्याचे नियमितपणे योग्य माध्यमातून वितरण केले जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र, प्रत्यक्षात औषधे मिळत नसल्याच्या रुग्णांच्या तक्रारीमुळे औषधांचा साठा, खरेदी, साठा आणि वितरण व्यवस्था तसेच रुग्णांपर्यंत औषधे पोहोचण्याच्या प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

रुग्णालयात औषधांचा पुरेशा साठा असल्याचे दावा केला जात असला, तरी रुग्णांना प्रत्यक्षात औषधे मिळत आहेत का, याची तपासणी होणे गरजेचे आहे. औषधांची उपलब्धता, खरेदी, साठा आणि वितरण याबाबतीत पारदर्शक माहिती सार्वजनिक करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा मिळाल्यानंतर भंडारा जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यसेवेकडून अपेक्षा वाढल्या आहेत. मात्र, औषधांसाठी बाहेरचा खर्च करावा लागत असल्याच्या तक्रारी कायम राहिल्यास दर दिवसांना सामान्य रुग्णांना नेमका किती फायदा होत आहे, हा प्रश्न अनुत्तरित राहणार आहे. संबंधित प्रशासनाने रुग्णांच्या तक्रारींची दखल घेऊन औषधसाठा आणि वितरण व्यवस्थेची प्रत्यक्ष तपासणी करावी, अशी मागणी होत आहे.

औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध

“आमच्याकडे योग्य तो औषधसाठा उपलब्ध आहे. कोणत्याही औषधाचा कमी पुरवठा नाही. कधी एखाद्या औषधाचा दोन-चार दिवस तुटवडा निर्माण होतो; मात्र त्याचे नियमितपणे योग्य माध्यमातून वितरण केले जाते.”

— सुजाता दुधगावकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भंडारा

“हात-पाय दुखण्याच्या त्रासावर माझे उपचार सुरू आहेत. मात्र, रुग्णालयात औषधी बेल्टसह काही आवश्यक सुविधा मिळत नाहीत. शासन सर्व सुविधा मोफत देत असेल, तर औषधे बाहेरून का घ्यावी लागतात? गरीब आणि गरजू रुग्णांनी कुठे जायचे? अशा सुविधा रुग्णालयात उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्या उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी आहे.”

— हिर्मनिश शहारे, रुग्ण, अंबाडी

“गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार रुग्णालयात येऊन २० रुपयांची चिठ्ठी काढूनही अनेक औषधे रुग्णालयाकडून दिली जात नाहीत. आधी येथे जनरल हॉस्पिटल होते, आता मेडिकल कॉलेज झाले; तरीसुध्दा नागरिकांना आवश्यक सुविधांचा अभाव जाणवत आहे.”

— राजकुमार साकोरे, रुग्ण, भंडारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *