जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्र तातडीने सुरू करा
शिवसेना (उ. बा. ठा.) चे जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन
दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- खरीपाच्या चालू हंगामातील हलक्या प्रजातीचे धान कापणीला जिल्ह्यात सुरवात झाली असतांना राज्य सरकारच्या पणन विभागातर्फे शासकीय आधारभूत केंद्र सुरू करण्यासंदर्भात कोणतेही आदेश अद्याप न काढल्यामुळे आधीच निसर्गाच्या बेतालपणाामुळे हवालदिल झालेला शेतकरी नव्याने आर्थिक संकटात सापडण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्बनि तातडीने पाऊले उचलण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या निवेदनाद्वारे करीत आहे.
जिल्ह्यात निसर्गाच्या लहरीपणाामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती असल्याने धानाला पाणी पुरविण्यासाठी रात्रीचा दिवस करून कसेबसे पिक जगविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी बांधवाने हलक्या प्रजातीचे धानाची कापणी आणि मळणी सुरू केलेली आहे. परंतु राज्य शासनाने अद्यापही धान खरेदी सुरू करण्याचे आदेश न दिल्यामुळे समोर दिवाळी सारखा सण असल्याने नाईलाजास्तव मळणी करून हातात आलेले पीक घेऊन शेतकरी बांधव व्यापाऱ्याकडे जाईल आणि व्यापारी शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये धान घेऊन शेतकऱ्याची लूट करेल.
आधीच निसर्गाचे दगा दिल्यामुळे हव्यार्भी लागवडीचा खर्चही निघेल की नाही या विवंचनेत असणाऱ्या शेतकरी बांधवांना मळणीनंतर प्रत्यक्षात उत्पादनात पावसाचा खंड पडल्यामुळे मोठी तुट होत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच शासनाने धान खरेदी केंद्र अद्याप सुरू न करून सुलतानी संकट उभे केलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी बांधव पार गोंधळलेला असून आता काय करायचे? अशा मानसिकतेत असून शासनाने लवकरात लवकर धान खरेदी केंद्र सुरू न केल्यास शेतकरी बांधवांना शेवटी व्यापाऱ्याच्या आश्रयास जावून त्याला परत एकदा आपली लूट उभ्या डोळ्यादेखत पाहण्यापलिकडे दुसरा रस्ताच उरलेला नाही. राज्य शासनाचा हा ‘रातीमागून घोडे’ काढण्याचा प्रकार नवीन नाही. दर्षमी ऑक्टोबर मध्ये हलक्या प्रजातीचे धानाची मळणी होते हे माहीत असताना सुद्धा धान खरेदी केंद्र चालू करण्यास विलंब करणे म्हणजे हे शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी कशाप्रकारे उभे आहे हे स्पष्ट होते.
पणन विभागाला जिल्ह्यातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यासंबंधीचे त्वरीत आदेश काढण्याची मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, जिल्हा समन्वयक सुधाकर कारेमोरे, उपजिल्हाप्रमुख किशोर चन्ने, शोभाराम तिजारे, तालुकाप्रमुख प्रमोद मेश्राम, ईश्वर भोयर, दिनेश नंदपुरे, ज्ञानेश्वर बावनकर, प्रवीण गावधने, विनायक सरोदे, शहरप्रमुख राकेश आग्रो, शहर संघटक मयूर जोशी, प्रशांत देशमुख, संजय झंझाड, विक्रांत मेश्राम, भोजराज भेंडेकर, सुनील सूर्यवंशी, पुरुषोत्तम शेंडे इत्यादी अनेक पदाधिकाऱ्यांने केलेली आहे. निवेदनाची प्रत राज्याचे पणन मंत्री आमदार जयकुमार रावल यांना सुद्धा पाठविलेली आहे.








