तलाठ्याने केलेल्या अन्याया विरोधात शेतकऱ्याच्या आमरण उपोषणाला यश

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- तालुक्यातील कोथुर्णा/खैरी येथील तलाठ्याने खोटा अहवाल देवून ३९ वर्षाअगोदर जमिनीची खरेदी करण्याचा करारनामा करून रजिस्ट्री करण्यास टाळाटाळ केली. न्यायालयाने उपोषणकर्त्यांच्या बाजुने निर्वाळा दिला. तरीही शेतमालकाकडून जमिनीची रजिस्ट्री करून देण्यात आली नाही. उलट त्याच शेतजमिनीची दुसऱ्याच्या नावाने रजिस्ट्री करून दिली. तलाठ्याने खोटा अहवाल सादर करून सिध्दार्थ लांजेवार यांचेवर अन्याय केला. त्याविरोधात सिध्दार्थ लांजेवार यांनी दि. १५ ऑक्टोबर पासून भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केला होता. उपोषणाच्या पाचव्या दिवशी दिनांक १९ ऑक्टोंबर शनिवारला दुपारी २ वाजता दरम्यान काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे भंडारा जिल्हाध्यक्ष पवन मस्के यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. यावेळी त्यांनी उपोषणकर्त्याच्या समस्या जाणून घेतल्या व त्या समस्या तहसीलदार भंडारा यांच्याकडे मांडल्या. त्यानंतर तहसीलदार भंडारा यांनी उपोषणकर्त्याच्या समस्यांविषयी चौकशी करण्याचे आश्वासन दिले व उपोषणकर्त्यांना उपोषण मागे घेण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी सिद्धार्थ लांजेवार, रामरतन रोडगे, सचिन लांजेवार, जयंत लांजेवार, मेश्राम ताई, लांजेवार ताई व कनोजे सर यावेळी उपस्थित होते.