भाजपच्या पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सहाव्यांदा संधी; नागपुरातील सहा पैकी चार आमदारांची पुन्हा वर्णीं

नागपूरः- विधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये ९९ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली असून १३ महिलांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पहिल्या यादीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मधून तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर जिल्ह्याच्या कामठी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. दरम्यान, नागपूर जिल्ह्यात भाजपचे सहा आमदार आहेत. त्यापैकी भाजपच्या आजच्या यादीत चार आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. नागपूरदक्षिण पश्चिम मधून देवेंद्र फडणवीस, नागपूर पूर्व मधून कृष्णा खोपडे, नागपूर दक्षिण मधून मोहन मते, तर हिंगणा मतदारसंघातून समीर मेघे या विद्यमान आमदारांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे. तर कामठी मतदारसंघात विद्यमान आमदार टेकचंद सावरकर यांची तिकीट कापून पुन्हा एकदा चंद्रशेखर बावनकुळे यांना त्यांच्या पारंपरिक मतदारसंघात संधी देण्यात आली आहे. असे असले तरी नागपूर मध्य या मतदारसंघात भाजपचे आमदार असतानाही या यादीत नागपूर मध्य साठीची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही.