गोंदिया विधानसभेत तुल्यबळ बहुजन चेहरा मिळाल्यास संभावित दोन्ही अग्रवाल उमेद्वारांना फुटणार घाम!

गोंदिया :- गोंदिया विधानसभेत सवर्ण समाजाची मक्तेदारी मोडून काळात शिवसेनेचे रमेश कुथे यांनी १९९५ आणि १९९९ मध्ये निवडणूक जिंकली होती. मात्र त्यानंतर या विधानसभेत बहुजन चेहरा ची प्रतीक्षा आता वीस वर्षांनंतर पूर्ण होणार की काय अशी परिस्थिती गोंदिया विधानसभेत निर्माण होत असल्याचे चित्र आहे. त्यातच गोंदिया विधानसभेत महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत.महायुती कडून विद्यमान आमदार विनोद अग्रवाल यांच्या नावाची घोषणा नुकतीच एका मेळाव्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती तर महाविकास आघाडी कडून नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या काँग्रेस प्रवेश कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे नाव घोषित केले होते त्यामुळे त्यामुळे हे दोघेही महायुती आणि महाविकास आघाडी कडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.२०१९ च्या निवडणुकीत या दोन्ही दिग्गजांनी आपआपल्या पक्षाला रामराम ठोकत निवडणूक लढविली. परिणामी या ५ वर्षाच्या कार्यकाळात बहुजन नेत्यांनीच भाजप व काँग्रेसला सांभाळले. मात्र “अच्छे दिन’ येताच बहुजनांनाडावलून पुन्हा त्याच नेत्यांना उमेदवारी देण्यात येत असल्याने एखाद्या पक्षातून तुल्यबळ बहुजन चेहरा अपक्ष म्हणून निवडणुकीत उडी घेणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. गोंदिया विधानसभेत १९९५ आणि १९९९ मध्ये रमेश कुथे यांनी शिवसेने कडून निवडणूक जिंकली होती. त्यानंतर २००४ पासून २०१९ पर्यंत गोंदिया विधानसभा वर कुणीही एक अग्रवाल यांचाच वर्चस्व राहिलेला आहे.

त्यामुळे गोंदिया मतदार संघात असा बहुजन चेहरा दोन्ही प्रमुख पक्षांनी द्यावा अशी मागणी होत असतानाच आजी-माजी आमदार विनोद अग्रवाल आणि गोपालदास अग्रवाल यांनी आपापल्या मूळ पक्षात प्रवेश केल्याने परत त्यांनाच उमेदवारी दिली जाणार असल्यामुळे बहुजन समाजात याविषयी खदखद निर्माण झालेली आहे. जिल्ह्यातील गोंदिया विधानसभा ही “हॉट सीट’ ठरत आहे. भाजप व काँग्रेसच्या उमेदवारांचे जवळपास कन्फर्म तिकीट झाले असल्याने निवडणुकीच्या रिंगणात निश्चितच अपक्ष म्हणून बहुजन चेहरा राहणार असल्याने या अपक्षामुळे कुणाचे गणित बिघडणार? असा प्रश्न सामान्य मतदाराला पडला आहे.गोंदिया विधानसभेला यावेळी काँग्रेस व भाजपकडून बहुजन उमेदवार राहणार असे सांगण्यात येत होते.मात्र जस जशी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. तेव्हापासून या दोन्ही पक्षात निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असलेल्या सवर्ण उमेदवारांनी संधी पाहून “घर वापसी’ केली.

मात्र या दोन्ही नेत्यांच्या अनुपस्थितीत मागील ५ वर्षात पक्षाची झालेली वाताहत थांबवून ज्या बहुजन नेत्यांनी पक्षाला सावरले व निवडणूक लढविण्याच्या लायकीचे बनविले. त्या बहुजन नेतृत्वाला झटकारण्याचे काम काँग्रेस व भाजपने केले.काँग्रेसमधील बहुजन नेते जरी शांत असले तरी भाजपातील बहुजन नेत्यांमध्ये आक्रोश खदखदत आहे.परिणामी एखाद्या नावाजलेल्या पदाधिकारी नी बंडखोरी करीत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतल्यास संपूर्ण समीकरण बिघडण्याची चिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे. असे शक्य झाल्यास दोन्ही पक्षातील अग्रवाल उमेदवारांना घाम कुठल्या शिवाय राहणार नाही, दुसरीकडे बहुजन उमेदवाराला क्षेत्रातील इतर बहुजनांना हातभार लागल्यास गोंदिया विधानसभेत २०१९ ची पुनरावृत्ती होणे शक्य असल्याचे आता जनचर्चा आणि राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.