कुठे नेऊन ठेवली आमची निराधार योजना

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- निराधार योजनेचे मानधन रखडले.आमची दिवाळी अंधारातच होणार का? कुठे नेऊन ठेवली आमची निराधार योजना असा प्रश्न निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी उपस्थित केला आहे.दिवाळीपूर्वी मानधन देण्यात यावे अशीही मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. लाडली बहिण योजनेचे लाभार्थी तुपाशी व निराधार योजनेचे लाभार्थी उपाशी या चर्चेला सर्वत्र उधाण आले आहे.राज्य सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावे तसेच लाभार्थ्यांचे मानधन महीन्या काठी देण्यात यावे अशीही मागणी होत आहे. निराधार योजनेत विधवा, दिव्यांग, परी तक्त्या, संजय गांधी निराधार, घटस्फोटीत, वयोवृद्ध अशा लाभार्थ्यांचा यात समावेश आहे.शासनाकडून मिळणाऱ्या या योजनेच्या लाभार्थ्यांचे मागील काही महिन्यापासून मानधन रखडलेले आहे. लाभार्थी मानधनाच्या प्रतीक्षेत आहेत. लाडली बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना योजना सुरू झाल्यापासून तातडीने दर महिन्याला त्यांचे मानधन पाठविले जाते परंतु निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मानधना अभावी शासनाने अडचणीत आणले आहे.

संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य व वयोवृद्ध कलाकार मानधन योजना राबविण्यात येतात.यात गरजू व्यक्तींना नियमित मानधन मिळावे असे अपेक्षित असतांना सुद्धा ते थांबविण्यात येते व लाडली बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना नियमित पाठविले जाते हे धोरण शासनाचे चुकीचे असल्याचे लाभार्थ्यांनी म्हटले आहे. राज्य शासनाने सदर योजनेचा लाभार्थ्यांना अडचणीच्या वेळी लाभ घेता येईल यासाठीच ही योजना लागू केली आहे.परंतु या योजनेच्या लाभार्थ्यांना वेळेवर लाभ घेता येत नाही ही एक मोठी शोकांतिका आहे. आणि यामुळेच लाभार्थी आर्थिक विवंचनेत सापडलेले आहेत.या योजनेचा वेळेवर लाभ मिळत नसल्यामुळे लाभार्थ्यांच्या मनात असंतोष खदखदत आहे.आमची दिवाळी अंधारातच होईल का असं संभ्रम पसरलेला आहे.