अखेर साकोली सेंदूरवाफा नगर परिषद झाली

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- मागील बऱ्याच दिवसापासून सुरू असलेला साकोली नगरपरिषदेच्या नावाच्या विषय अंततः शासनाच्या आदेशाने निकाली लागला असून यानंतर साकोली सेंदूरवाफा नगरपरिषद असे फलक नगरपालिका प्रशासन च्या वतीने लावण्यात आले आहे. नगर परिषदेच्या नावात राज्य सरकारने अखेर बदल केला असून, नागरिकांच्या मागणीप्रमाणे नगर परिषदेचे नाव साकोली सेंदूरवाफा असे करण्यात आले आहे. या नामाभिदानास दि. ११ ऑक्टोबर रोजी राज्यपालांच्या सहीने मंजुरी मिळाली. ८ वर्षांपूर्वी साकोली व सेंदूरवाफा या २ स्वतंत्र गावांच्या ग्रामपंचायती विसर्जित करून दोन्ही गावांच्या सहमतीने साकोली नगर परिषदेची निर्मिती करण्यात आली होती. नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने बाजी मारून एकहाती सत्ता मिळविली होती. नगराध्यक्ष म्हणून धनवंता राऊत विजयी झाल्या होत्या. त्यावेळी सेंदूरवाफावासीयांना निव्वळ साकोली हे नाव खटकत होते. दोन्ही गावे लोकसंख्येच्या दृष्टीने तुल्यबळ असल्याने सेंदूरवाफावासीयां च्या मनात नगर परिषद गठण प्रक्रियेत आपले अस्तित्व संपुष्टात आल्याची भावना निर्माण झाली होती. यासंदर्भात सत्ताधारी भाजपच्या वतीने नाव बदलण्यासाठी व साकोली सेंदूरवाफा करण्यासाठी वारंवार निवेदने दिल्या गेली. त्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. अखेर या सर्वांच्या पाठपुराव्याला यश मिळाले. फेब्रुवारी २०२४ मध्ये मंत्रिमंडळाने नावात बदल करण्यास संमती देऊन हरकती मागविल्या होत्या. परंतु, यासंदर्भात कोणीही आक्षेप न नोंदविल्यामुळे अखेर राज्यपालांच्या स्वाक्षरीने नगरविकास विभागाने नावात बदलास मंजुरी दिल्याचे पत्र ११ ऑक्टोबर रोजी जारी केले आहे.