आदर्श आचारसंहितेचे पालन करा -अश्विनी मांजे

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- राज्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा झाली असून, आदर्श आचारसंहितासुद्धा लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर साकोली विधानसभा क्षेत्रात निवडणुकीच्या तयारीसाठी तालुका प्रशासन सज्ज झाले आहे. उपविभागीय अधिकारी तथा सहा. निवडणूक अधिकारी अश्विनी मांजे यांनी साकोली येथे पत्रपरिषद घेऊन निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती दिली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सिडाम, साकोलीचे तहसीलदार नीलेश कदम, लाखनीचे तहसीलदार देशमुख, लाखांदूर तहसीलदार वैभव पवार, पोलिस निरीक्षक संजय गायकवाड आदी उपस्थित होते. साकोली विधानसभा क्षेत्रात साकोली, लाखनी व लाखांदूर या३ तालुक्यांचा समावेश आहे. मतदान केंद्राची संख्या ३७९ असून, या विधानसभा क्षेत्रात पुरूष मतदार संख्या १६३५९४ तर स्त्री मतदारसंख्या १६३४०५ आहे. एकूण ३२६९९९ मतदार आहेत. निवडणुकीच्या घोषणेसह आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, साकोली विधानसभा क्षेत्रांत निवडणुकीचा महासंग्राम रंगणार आहे. राजकीय पक्षांच्या डावपेचाला प्रारंभ झाला आहे. साकोली विधानसभा मतदार संघात निवडणुकीचा आखाडा यावेळी चांगलाच रंगणार आहे. महायुती आणि महाआघाडीने एकमेकांविरूद्ध मोर्चेबांधणी केली असली तरी उमेदवार कोण असणार? याची प्रतीक्षा आहे. महायुतीत दावेदारीची होड दिसत असून उमेदवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मतदारांची संख्या आहे. १८ ते १९ वयोगटातील ८६४५ नवमतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. ८५ वर्षांवरील २५६९मतदार आहेत. तर दिव्यांग मतदारांची संख्या ३१७२ आहे. सखी मतदान केंद्राची संख्या ३, नव मतदार केंद्र ३ व दिव्यांग मतदार केंद्र १ स्थापित करण्यात येणार आहे.