दिल्लीतून पत्र, काँग्रेसकडून २ उमेदवारांची घोषणा; नांदेड लोकसभेसाठी रविंद्र चव्हाण यांना उमेदवारी

मुंबई:- राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर नांदेडमधील पोटनिवडणुकांची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केली आहे. राज्यातील विधानसभेसाठी एकाच टप्प्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्याचप्रमाणे नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी देखील २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेसने अधिकृतपणे परिपत्रक जारी करत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी रविंद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर केली आहे. रविंद्र चव्हाण हे नांदडचे दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे सुपुत्र आहेत. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी वसंत चव्हाण यांचे निधन झाल्यामुळे येथील जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गेल्याच महिन्यात महाराष्ट्र दौरा केला होता, त्यावेळी नांदेडमध्ये दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांच्या घरी जाऊन सांत्वनपर भेट घेतली होती. त्याचवेळी, येथील पोटनिवडणुकीतसाठी रविंद्रचव्हाण यांनाच उमेदवारी देण्यात येईल, असे त्यांच्याकडून सांगण्यात आलं होतं. आता, काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्या सहीने पत्र जारी करण्यात आले असून रविंद्र चव्हाण यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. यासह, मेघालय येथील विधानपरिषद निवडणुकीसाठी जिंगजँक मरक यांना संधी देण्यात आली आहे. काँग्रेसकडून या २ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे, आता नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी भाजप महायुतीकडून कोणाला उमेदवारी देण्यात येईल, याची चर्चां राजकीय वर्तुळात असून अनेकांना उत्सुकता लागून आहे.