निवडणुक आयोगाने दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करा- जिल्हाधिकारी प्रजित नायर

गोंदिया:- विधानसभा निवडणुक-२०२४ कार्यक्रम घोषित होताच जिल्हा प्रशासन इलेक्शन मोडमध्ये आले आहेत. आज १७ ऑक्टोंबर २०२४ रोजी सर्व निवडणुक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणुक अधिकारी, नोडल अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. निवडणुक आयोगाने दिलेल्या सर्व सुचनांचे पालन करून कामकाज करण्याच्या सुचना आज जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी यावेळी सर्व नोडल अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहामध्ये आज नोडल अधिकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते.

बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरूगानंथम, अप्पर जिल्हाधिकारी घनश्याम भुगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपजिल्हा निवडणूक अघिकारी किरण अंबेकर, गोंदियाचे उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, आमगाव उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, तिरोडा उपविभागीय अधिकारी पुजा गायकवाड, अर्जुनी-मोरगांव उपविभागीय अधिकारी वरूण शहारे, तहसिलदार अनिरूद्ध कांबळे, अक्षय पोयाम, नारायण ठाकरे, समशेर पठाण यांच्यासह विविध विभागाचे नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते. आचार संहिता लागु होताच जिल्ह्यामध्ये लावण्यात आलेले होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर काढुन टाकण्याच्या सुचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. निवडणुक काळामध्ये काळ्या पैशाची होणारी देवाण-घेवाण, दारू, अंमली पदार्थ, भेट वस्तुचे वाटप यावर नियंत्रण आणण्याचे निर्देश देण्यात आले. मतदान प्रक्रियेमध्ये प्रत्येक नागरिकांनी सहभागी व्हावे व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी चारही विधानसभा मतदार संघामध्ये मतदार जनजागृती करावी. मतदान केंद्रावर आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिल्या.