तुमसर विधानसभा मतदारसंघात”राष्ट्रवादी’ विरुद्ध “राष्ट्रवादी’

दै.लोकजन वृत्तसेवा भंडारा :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार चरण वाघमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) मध्ये प्रवेश केल्याने तेच महाविकास आघाडीचे तुमसर मतदारसंघातील उमेदवार असतील, हे निश्चित मानले जात आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी विद्यमान आमदार राजू कारेमोरे यांना पुन्हा उमेदवारी देणार, असे सूचक विधान केल्यामुळे आता तुमसर विधानसभा मतदारसंघात “राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी’ असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. भंडारा जिल्ह्यातील कायम चर्चेत राहणाऱ्या तुमसर विधानसा मतदारसंघावर सर्वच राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारल्यावर चरण वाघमारे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार राजू कारेमोरे यांच्यापुढे भाजपचे प्रदीप पडोळे यांचे नव्हे तर चरण वाघमारे यांचेच आव्हान होते. त्या लढतीत राजू कारेमोरे केवळ ७ हजार मतांच्या फफरकाने विजयी झाले होते. काही दिवसांपूर्वी भाजपशी एकनिष्ठ असलेले माजी खासदार शिशुपाल पटले यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर ते महाविकास आघडीचे उमेदवार असतील अशा चर्चांना उधाण आले होते.

मात्र, भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करताच त्यांनाच आघाडीकडून उमेदवारी दिली जाईल, हे निश्चित मानले जात आहे. त्यामुळे आमदार कारेमोरे हातात घड्याळ बांधून तर वाघमारे तुतारी फुंकत मैदानात उतरतील, असे बोलले जात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या सत्तांतराचा लाभ आमदार कारेमोरे यांना झाला. त्यामुळेच भाजपचा बालेकिल्ला असलेल्या तुमसर मतदारसंघात राष्ट्रवादीकडून कारेमोरे यांची वर्णी लागली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फफूट पडल्यानंतर कारेमोरे यांनी अजित पवारांचा हात धरला. त्यामुळे त्यांना दुहेरी लाभ झाला. शिवाय, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचे ते खंदे समर्थक असल्याने २०२४ मध्येही कारेमोरे यांना संधी देण्यासाठी पटेल संपूर्ण ताकद लावत आहेत. मात्र, राष्ट्र वादीत फुटीनंतर तुमसर क्षेत्रात एकमोठा गट शरद पवारांसोबत गेला आणि राजकीय उलथापालथ झाली. या मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ताकद मोठी असल्याने ही निवडणूक कारेमोरे यांना जड जाणार असल्याचे बोलले जात आहे.