राजू शेट्टींना लॉटरी, खासदार कोट्यातून मुंबईत म्हाडाचं घर; जाणून घ्या स्वप्नातील घराची किंमत?

मुंबई:- राजधानी मुंबईत आपलं स्वत:चं घर असाव हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. स्वप्ननगरी असलेल्या मुंबईतील या घरासासाठी राज्यातील आमदार-खासदार व इतर लोकप्रतिनिधीही इच्छुक असतात. त्यामुळेच, म्हाडाच्या लॉटरीमध्ये लोकप्रतिनिधींसाठीही घराची आरक्षित सोडत असते. गेल्या महिन्यात म्हाडाकडून २०३० घरांसाठी लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आता, या लॉटरीची सोडत आज निघाली असून २०३० जणांचं मुंबईतील स्वप्नाचं घर आता सत्यात उतरलं आहे. त्यामध्ये, अनेक मराठी कलाकारांना घर लागलं असून माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनाही म्हाडाच्या लॉटरीत घर मिळालं आहे. या सोडतीसाठी १ लाख १३ हजार जणांनी अर्ज केला होता. मात्र, या अर्जदारांपैकी फक्त २०३० भाग्यवंतांना हे घर मिळाले आहे. उर्वरित अर्जदारांची निराशा झाली आहे. पण, गृहनिर्मांण मंत्री अतुल सावे यांनी घराचे स्वप्न बघणाऱ्यांना खुशखबर दिली आहे. लवकरच आणखी एक लॉटरी आणणार आहोत, असे सावे यांनी जाहीर केले आहे. मुंबईमध्ये स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. महाराष्ट्रात १९७७ साली म्हाडाची स्थापना झाली. तेव्हापासून म्हाडाने सर्वांसाठी घरं बांधली. म्हाडाने आतापर्यंत साडे सात लाख घरं वाटली आहेत. त्यातील अडीच लाख घरं मुंबईतच दिलेली आहेत.प्रत्येकाला आपलं घर मिळावं हाच यामागचा उद्देश आहे.

०८ ऑक्टोंबर च्या लॉटरीसाठी एक लाख तेरा हजार अर्ज आले होते. त्यापैकी, २०३० जणांना म्हाडाच्या लॉटरीत नशिबाने घर मिळालं आहे. राजू शेट्टी यांनी खासदार कोट्यातून या घरासाठी अर्ज केला होता. त्यानुसार, त्या कोट्यातून त्यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांना म्हाडाची लॉटरीजाहीर होण्यापूर्वींच त्यांचे घर निश्चित झालं होतं. म्हाडाने ०८ ऑक्टोंबर रोजी अधिकृत सोडत जाहीर केल्याने माजी खासदार राजू शेट्टी देखील आता मुंबईकर होणार आहेत, त्यांना मुंबईतील पवई भागात घर मिळालं असल्याने ते आता पवईकर होणार आहेत. शिवार ते मुंबई पवईकर असा राजू शेट्टींच्या घराचा प्रवास आहे. राजू शेट्टी यांनी एमपी म्हणजेच खासदार कोट्यातून मध्यम श्रेणीतील घरासाठी अर्ज केला होता. त्यानुसार, त्यांना पवईतील मध्यम श्रेणीतील घर लागलं असून या घराची किंमत जवळपास १ कोटी २० लाख रुपये एवढी आहे. या कोट्यात एकूण ३ घरं उपलब्ध होती, त्यामध्ये केवळ एक अर्ज आल्यानं राजू शेट्टी यांना लोकप्रतिनिधी कोट्यातून मुंबईकर होण्याची संधीमिळाली. राजू शेट्टी यांना पवईतील कोपरी पवई येथील घरं लागलं आहे, त्यांनी ज्या घरासाठी अर्ज केला होता त्याची किंमत १ कोटी २० लाख १३ हजार ३२३ रुपये इतकी आहे. त्यामुळं म्हाडाची सोडत जाहीर होण्यापूर्वींच त्यांचं मुंबईतील घराचं स्वप्न पूर्ण झालं होतं, पण ०८ ऑक्टोंबर रोजी म्हाडाकडून त्यांच्या देखील घराची अधिकृत घोषणा झाली आहे.