पवार टोली येथे प्राथमिक सुविधा उपलबद्ध करा

दै.लोकजन वृत्तसेवा साकोली :- खासदार प्रशांत पडोळे यांच्या नेतृत्वात, जि. प. सदस्या शितल राऊत, उपसरपंच प्रशांत कापगते तसेच ग्रा. पं. सदस्य तुळशीदास पटले यांच्या उपस्थितीत परसोडी ग्रा. पं. अंतर्गत येणाऱ्या पुनर्वसित पोवारटोली येथील नागरी सुविधांविषयी दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता निवेदन देण्यात आले. यावेळी आ. नरेंद्र भोंडेकर देखील उपस्थित होते. मागील अनेक वर्षांपासून पोवारटोली पुनर्वसन येथे नागरी सुविधा उपलब्ध करण्याकरीता येथील ग्रा. पं. सदस्य तुळशीदास पटले यांच्यावतीने संबंधित अधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करण्यात येत आहे. दि. २८ सप्टेंबर २०२४ रोजी यासंदर्भात खा. प्रशांत पडोळे यांनी लक्ष घालण्याबाबत निवेदन देण्यात आलेहोते. त्या निवेदनाची दखल घेत डॉ. प्रशांत पडोळे यांनी जिल्हाधिकारी यांच्या दालनात बैठक घेतली. सदर निवेदनात असे निर्देशित करण्यात आले की १२ वर्षाअगोदर पोवारटोलीचे पुनर्वसन झाले आहे.

नदीपात्र जवळील जुने असलेले घरे पाडून सर्व लोकांनी नवीन ठिकाणी कर्जबाजारी होऊन घरे बांधले. याठिकाणी जवळपास ७० घरांची वस्ती बसलेली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत गावाचे पुनर्वसन झालेले आहे आणि नैसर्गिक आपत्ती / पूर प्रतिबंधक योजना २०१८ अंतर्गत शासनाने जुने घरांचा ताबा सोडण्याकरिता सर्वांना पत्रपाठवले की २ वर्षाच्या आत जुन्या घरांचा ताबा सोडावे. यानुसार सर्वांनी कोणत्याही सोयी उपलब्ध नसताना कर्जबाजारी होऊन जुने घराची जागा सोडून नवीन ठिकाणी घरे बांधली. असे असूनही गत १२ वर्षात नवीन ठिकाणी सरकारने एकही प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. पक्के रस्ते, पक्की नाली, अंगणवाडी, शाळा, क्रीडांगण, समाजभवन, मंदिर इत्यादी सुविधांचा अभाव असल्याने येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यासंदर्भात शासनाने योग्य तो निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली. यावेळी पुनर्वसन सुविधांबाबत जिल्हाधिकारी यांनी सकारात्मकता दर्शविली.