उमेद अभियान कर्मचाऱ्यांचे जिल्हास्तरीय बेमुदत आंदोलन सुरु

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभर राबविण्यात येते. या अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सक्रियतेने काम सुरू आहे. अभियानाच्या माध्यमातून तब्बल ३००० अधिकारी व कर्मचारी मागील दहा वर्षापासून कंत्राटी स्वरूपाने काम करीत आहेत. सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागील तीन वर्षापासूनच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी शासन दरबारी वेळोवेळी मागणी करण्यात आली होती. परंतु मागणी मान्य न केल्यामुळे दि. ०३ ऑक्टोबर २०२४ पासुन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद भंडारा येथे व सर्व पंचायत समिती स्तरावर बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे.

महाराष्ट्र शासनाकडून राबवण्यात येणारे उमेद अभियान हे महिला स्वयं सहायता समूह (बचत गट) स्थापन करण्यापासून महिलांना व्यवसायात उभे करण्यापर्यंत गावोगावी काम करत आहे. महिलांच्या विविध स्तरावर संस्था स्थापन करून त्या संस्था बळकट करताना महिलांची आर्थिक उन्नती साधून दारिर्द्य निर्मूलनाचे काम मोठ्या प्रमाणत करीत आहे. सद्यस्थितीमध्ये राज्यात सुमारे ८४ लाख कुटुंब या अभियानामध्ये समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील ९० टक्के महिलांचा सहभाग अभियानामध्ये झालेला आहे त्यामुळे अभियानाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये विकसित भारत करण्याची संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी उमेद अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग होणे आवश्यक आहे.

यामुळे अभियानाच्या माध्यमातून सुरू असलेले काम हे शाश्वत आणि चिरकाल सुरु राहील. उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत कर्मचारी व अधिकारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेण्याची मागणी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे. या प्रमुख मागणीच्या अनुषंगाने संघटनेच्या वतीने गाव स्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत टप्प्याटप्प्याने कृती कार्यक्रमाची आखणी करण्यात आलेली आहे.

या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधून मागण्या मान्य करण्यासंदर्भात लोकशाही पद्धतीने गाव, प्रभाग, तालुका, जिल्हा व राज्य स्तरावरआंदोलने, प्रभात फेरी, मागणीबाबत जनजागृती मेळावे, उमेद मागणी जागर, दिंडी व महा अधिवेशन भरविण्यात येणार असल्याचे राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हा मार्गदर्शक गौरवकुमार तुरकर, जिल्हा अध्यक्ष प्रमोद पटले व कॅडर संघटनेचे अध्यक्षा जयश्री फसाटे यांनी बहुसंख्येने सह कुटुंब आंदोलनात बेमुदत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.