ओबीसींच्या अनेक प्रश्नांवर मंत्री अतुल सावे यांची मॅरेथॉन बैठक; बहुतांश प्रश्न तत्काळ निकाली

नागपूर:- राज्यातील ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी समाजातील विद्यार्थ्यांंच्या सोयीसाठी आवश्यक वसतिगृह येत्या ६ ऑक्टोबरपर्यंत सुरू करणार, अशी घोषणा ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केली आहे. यासोबतच ओबीसी संघटनांनी सादर केलेल्या निवेदनातील प्रत्येक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे, असा विश्वासही त्यांनी दिला. विदर्भस्तरीय २९ ओबीसी संघटनांच्या ओबीसी-व्हीजेएनटी समन्वय समितीची बैठक नागपुरातील “महाज्योती’ च्या सभागृहात मंगळवारी झाली. तब्बल दीड-दोन तासांवर चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत ओबीसींच्या प्रत्येक प्रश्नांवर गंभीरपणे चर्चां करण्यात आली. बहुतांश प्रश्न तत्काळ निकाली काढण्याची ग्वाहीदेखील सावे यांनी यावेळी दिली. या बैठकीला “महाज्योती’ चे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले, ओबीसी बहुजन कल्याण मंत्रालयाचे उपसचिव दिनेश चव्हाण, आर्थिकविकास महामंडळाचे अरविंद माळी, ओबीसी बहुजन कल्याण विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिल्लारे यांची प्रमुख उपस्थिती होती.