स्कूल व्हॅनने ९ वर्षीय विद्यार्थ्याला चिरडले, घटनास्थळीच मृत्यू

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- बाहेरून घरी परत जात असलेल्या एका ९ वर्षीय विद्यार्थ्याला एका स्कूल व्हॅन (ओमनी) ने चिरडल्याची हृदयद्रावक घटना आज सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास भोजापूर मार्गावर घडली. या अपघातात विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला. आदी रुपचंद बागडे (९, रा. भोजापूर) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो संत शिवराम शाळेत चवथ्या वर्गात शिकत होता. आदी सकाळी दुकानाच्या जवळ असलेले गेलेक्सी अपार्टमेंट समोरील रोडवर मित्रासोबत सायकल चालवित होते. सायकलने परत येत असताना भोजापूर मार्गावर भरधाव वेगाने येणाऱ्या एका स्कूल व्हॅनने त्याला चिरडले. एम एच ३६- एच ८४८६ क्रमांकाची ही खासगी स्कूल व्हॅन रॉयल पब्लिक शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जात होती. चालकाचे नाव सुरज भोजराज कडनाईके (२०) रा. गिरोला पुन. असे आहे. अपघातानंतर स्कूल व्हॅन चालकाने घटनस्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पुढे काही अंतरावर नागरिकांनी या स्कूल व्हॅनला अडविले आणि चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. अपघातानंतर गावातीलच काही मुलांनी त्यास ओमनी गाडीमध्ये खासगी रुग्णालयात नेले. मात्र आदी ची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरने त्याला सामान्यरुग्णालयात रेफर केले. तेथे डॉक्टरने तपासून त्यास मृत घोषित केले. आदीचे वडील रुपेश बागडे यांची घराशेजारी चहाची टपरी असून त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मुलाच्या अपघाती मृत्यूने बागडे कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. स्कूल व्हॅन चालकाकडून झालेल्या या अपघातामुळे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरले आहे.