समर्थ महाविद्यालय लाखनीतर्फे गांधी जयंती निमित्त “स्वच्छमेव जयते’ स्वच्छता अभियान

दै.लोकजन वृत्तसेवा लाखनी :- स्थानिक राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय, लाखनीतर्फे सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून आणि गांधी जयंतीच्या निमित्ताने “स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत “स्वच्छमेव जयते’ या विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. २ ऑक्टोबर २०२४ रोजी हा व्यापक स्वच्छता उपक्रम लाखनी तालुक्यातील २५ गावांमध्ये एकाच वेळी राबविला जाणार आहे. या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे ग्रामस्वच्छता व सामाजिक जागरूकता वाढविणे असून, हे अभियान प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात राबविले जात आहे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना आणि सांस्कृतिक विभागातील विद्यार्थी तसेच प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवतील. विशेष म्हणजे, ग्रामपंचायत प्रमुख, सरपंच आणि गावकरी यांना या उपक्रमात सहभागी करून घेतले जाणार आहे. महाविद्यालय आणि गाव यांच्यातील संयुक्त सहकार्यामुळे या उपक्रमाला व्यापक स्वरूप मिळेल आणि स्वच्छता अभियान यशस्वीरीत्या राबवले जाईल.

या स्वच्छता अभियानाची जबाबदारी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख धनंजय गिऱ्हेपंुजे आणि राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅप्टन बाळकृष्ण रामटेके यांच्यावर देण्यात आली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कर्मचारीवर्ग गावांमध्ये जाऊन स्वच्छता मोहीम राबवतील. या अभियानात प्रत्येक गावात ग्रामपंचायतींना साथ मिळणार असून, गावकऱ्यांनी देखील यात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. लाखनी तालुक्यातील २५ गावांमध्ये महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. यात लाखनी नगरपंचायत परिसर तसेच सावरी, मुरमाडी, सोमलवाडा, खेडेपार, गोंडसावरी, गडेगाव, केसलवाडा वाघ, रेंगेपार कोहळी, पिंपळगाव, मानेगाव, पोहरा, रेंगेपार कोठा, लाखोरी, सेलोटी इत्यादी गावांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये ग्रामपंचायत सदस्य, स्थानिक नागरिक, युवक, आणि स्वयंसेवक एकत्रित येऊन स्वच्छतेचे विविध उपक्रम राबवतील. प्रत्येक गावात, रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, मंदिर परिसर, शाळा, आणि इतर ठिकाणी स्वच्छता अभियान प्रभावीपणे पार पडणार आहे. प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांनी या अभियानाच्या यशस्वीतेसाठी सर्व आजी-माजी विद्यार्थी, महाविद्यालयीन कर्मचारी आणि सामाजिक जबाबदारी असलेल्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

“स्वच्छता ही सेवा’ या संकल्पनेला साकार रूप देण्यासाठी आणि स्वच्छ व सुंदर भारत निर्माण करण्याच्या दिशेने हे अभियान महत्वपूर्ण पाऊल ठरेल, असा त्यांचा विश्वास आहे. समर्थ महाविद्यालयाच्या या उपक्रमामुळे तालुक्यात स्वच्छतेबाबत जनजागृती वाढेल आणि सामाजिक जबाबदारीची भावना वृद्धिंगत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. महात्मा गांधींनी दिलेला स्वच्छतेचा संदेश ग्रामीण भागात पोहोचविणे आणि गावकऱ्यांना स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने अधिक सजग बनवणे, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. अभियानाच्या यशस्वीतेनंतर, या योजनेचा अहवाल भारत सरकारकडे पाठविला जाणार असून, अन्य गावांसाठी देखील प्रेरणादायी ठरेल. समाजसेवा, स्वच्छता आणि राष्ट्र उभारणीच्या दृष्टीने समर्थ महाविद्यालयाने राबविलेला हा उपक्रम एक महत्वपूर्ण पाऊल ठरले आहे, असे मत तालुक्यातील नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.