राष्ट्रीय लोक अदालतीत १२५ प्रकरण्ो निकाली

 दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- दाखलपूर्व आणि प्रलंबित खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले सामोपचाराने मिटावेत या हेतूने दि. २८ सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे दिवाणी न्यायालय (क) स्तर साकोली येथे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालत मध्ये १२५ प्रकरणांचा निपटारा झाला असून त्यात २३ लाख ३९ हजार ६०१ रुपयांची वसुली झाली आहे. दिवाणी न्यायालय (क) स्तर साकोलीचे प्रमुख न्यायाधीश व्हि. एम. गायकवाड यांच्या मार्गदर्शनात या राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले. सह दिवाणी न्यायाधीश (क) स्तर तथा पॅनल प्रमुख एस. आर. जैन व अधिवक्ता साकोली सदस्य पी. एल. बघेले यांनी या प्रकरणांचा निपटारा केला. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक वानखेडे उपस्थित होते. न्यायालयीन प्रकरणांमध्ये एकूण २३७ पैकी ८२ प्रकरणे लोक अदालतमध्ये निकाली काढण्यात आली. या प्रकरणामधील १५ लाख ६२ हजार २३१ रुपयांची वसुली झाली. तसेच प्रलंबित प्रकरणांमध्ये १४९३ पैकी ४३ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात सात लाख ७७ हजार ३७० रुपयांची वसुली करण्यात आली. प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी सहाय्यक अधीक्षक आर. पी. राऊत, वरिष्ठ लिपिक एन. पी. साकोरे, लघुलेखक धकाते, कनिष्ठ लिपिक तालुका विधी सेवा समिती आर. एम. नेवारे, कनिष्ठ लिपिक एस. सी. गमे, हुंदरी, शहारे, सूर्यवंशी, पी. के. निपाणे, तसेच बेलीफ भुरे, लंजे, गायधने, मेश्राम विधी स्वयंसेवक एल. ए. मल्लानी, बी. एस. वासनिक तसेच वकील संघ व पोलीस कर्मचारी यांनी सहकार्य केले.