पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांना निलंबित करा

दै.लोकजन वृत्तसेवा भंडारा:- स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचवडकर यांना निलंबित करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे मागणी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांनी पत्र परिषदेतून केली. मोहन पंचभाई पुढे म्हणाले, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे भंडारा जिल्ह्याचे अध्यक्ष पवन यादोराव वंजारी, मु. इंदुरखा यांना दि. २७ सप्टेंबर रोजी रात्री ९.०० वाजता त्यांच्या परिवारातील दोन सदस्य शासकीय रुग्णालय, भंडारा येथे भरती असतांना पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेतील ४ कर्मचाऱ्यांनी कोणतीही सुचना न देता बळजबरीने गैरकायदेशीरमार्गाचा अवलंब करुन पवन ताब्यात घेतले. त्यांना दि. २८ सप्टेंबर रोजी रात्री १०.२० वाजेपर्यंत पोलीस स्टेशन भंडारा येथे गैरकायदेशीर मार्गाने डिटेन करुन हीन व घाण वागणुक दिली. त्यामुळे पवन वंजारी यांची व पक्षाची समाजात फार मोठी मानहानी झाली. पवन वंजारी यांनी त्यांच्या परीवरातील दोन सदस्य शासकीय रुग्णालयात भरती असून माझ्या व्यतिरिक्त त्यांची देखभाल करणारा कोणीही नाही,

मला त्यांची देखभाल व जेवणाची व्यवस्था करण्याकरीता मला कोणाशीही संपर्क करु द्या असे बोलून सुद्धा पोलीसांनी त्यांचे ऐकले नाही. त्यांनी आम्हाला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांचे सक्त आदेश आहे. पवन वंजारी जिथे असेल तिथुन आणून कोठडीत घाला त्यांची कोणतीहीपर्वा करायची नाही व त्याची कोणतीही गोष्ट ऐकून घ्यायची नाही, असे सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले. यावरुन नितीन चिंचोळकर हे हेतुपुरस्पर पवन वंजारी यांना बदनाम करण्याच्या उद्देशाने व भारतीय राष्ट्रीय काँगेसच्या पदाधिकाऱ्यांना त्रास देण्याच्या हेतूने भारतीय जनता पार्टीला सहन करण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचे कृत्य करीत आहेत. त्यामुळे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांना भारतीय न्याय संहिता २०२३ च्या उचित कलमा अंतर्गत उचित कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी मोहन पंचभाई यांनी केली. पत्र परिषदेत राजेश हटवार, धनंजय तिरपुडे, पवन वंजारी, गजानन झंझाड, राजकपूर राऊत उपस्थित होते.