रेतीची अवैध तस्करी करणारा ट्रॅक्टर जप्त

दै. लोकजन वृत्तसेवा पालांदूर (चौ.):- लाखनी तालुक्यातील चूलबंद नदीच्या अनेक रेतीघाटातून अवैधपणे रेतीची मोठ्या प्रमाणावर तस्करी राजरोसपणे सुरू आहे. यावर वारंवार आळा घालण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र मुजोर रेतीचोर मात्र प्रशासनाला न जुमानता तस्करी करीतच आहेत. अशातच सोमवारी (१७ जून) पोलिसांनी अवैध रेतीची वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर जप्त केला आहे. या धडाकेबाज कारवाईने अवैध रेतीतस्करांचे धाबे दणाणले आहे. लाखनी तालुक्यातील ग्रामीण परिसरात होत असलेली रेतीची अवैध वाहतूक ही प्रशासनासमोर आव्हान ठरलेली आहे.रेतीची रात्रंदिवस वाहतूक सुरू असल्याने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पालांदूर पोलिसांनी १७ जूनच्या सायंकाळी ५.०० वाजताच्या सुमारास पोलीस कर्मचारी प्रो. रेड जुगार कामी कर्तव्यावर असताना निमगाव-घोडेझरी मार्गावर एका सिल्व्हर रंगाचा आईशर ३३३ कंपनीचा रामप्रकाश दुर्योधन गोटेफोडे (४४ वर्षे, रा. भुगाव, ता. लाखनी) याच्या मालकीचा व चालक नामे केदार दुर्योधन बारस्कर (३७ वर्षे, रा. भूगाव, ता.लाखनी) हा चालवत असलेला विना क्रमांकाचा ट्रॅक्टर अंदाजे किंमत २ लाख रुपये वनिळ्या रंगाची विनाक्रमांकाची ट्रॉली अंदाजे किमत १ लाख रुपये ज्यात अंदाजे एक बॉस रेती भरलेली किंमत ५ हजार असा एकूण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चूलबंद नदीघाटातून अवैधरीत्या रेतीचोरी करून विनापरवाना वाहतूक करताना आढळून आल्याने चालक व मालकाविरोधात तक्रारीवरून पालांदूर पोलिसांनी पो. शि. नविद पठाण यांच्या फिर्यादी वरून अप. क्र.९८/२०२४ ३७९,१०९ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनात पालांदूर पोलीस करीत आहेत.