डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या ग्रंथाची “इंटरनॅशलन बुक ऑफ रेकार्ड’मध्ये नोंद

दै.लोकजन वृत्तसेवा साकोली :- झाडीबोली चळवळीचे प्रणेते डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या “मराठी अंत्याक्षरी शब्दकोश’ या ग्रंथाची नोंद जगातील सर्व असामान्य उपक्रमांचा संग्रह असलेल्या इंटरनॅशनल बुक आफ रेकार्ड मध्ये घेण्यात आलेली आहे.डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी कथा, कविता, नाटक, एकांकिका, संगितीका इत्यादी ललित साहित्यासोबतच भाषा, बोली, लोकसाहित्य, लोककला, कोश अशा ललितेतर प्रकारातही लेखन केले असून त्यांच्या एकूण ग्रंथांची संख्या १११ झालेली आहे. कोशवाययात त्याचे विशेष कार्य असून “झाडीबोली मराठी शब्दकोश’, “झाडीपट्टीतील शब्दसाधक’, “आध्यात्मिक कोश’, “कोहळी ग्रंथकार’ असे ग्रंथ त्यांनी परिश्रमपूर्वक निर्माण केले आहेत. पण त्यात “अंत्याक्षरी शब्दकोश’ हा पूर्णपणे वेगळा आहे. काहीतरी भिन्न स्वरूपाचे लेखन करण्याच्या शोधात असलेल्या बोरकरांनी हा शब्दकोश आद्याक्षरांच्या क्रमाने तयार न करता शब्दातील अंत्य अक्षराच्या क्रमाने रचला आहे. जगात प्रत्येक भाषेत अनेक शब्दकोश निर्माण झाले असले तरी ते सर्व त्या त्या भाषेतील शब्दांच्या आद्याक्षर क्रमाने रचले गेले आहेत. बोरकरांनी मात्र या पद्धतीचा त्याग करून एक नवीन उपक्रम प्रत्यक्षात आणला आहे. याकरिता त्यांना जे परिश्रम करावे लागले त्याचे वर्णन करणेदेखील अशक्य आहे.

प्रथम सर्व शब्दांचे कार्ड तयार करणे, त्यांना अंत्याक्षराच्या क्रमाणे लावणे यासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम निश्चितच शब्दातित आहेत. पुणे येथील अनुबंध प्रकाशनचे अ. अ. कुलकर्णी यांनी हे पुस्तक प्रकाशित करण्याचे जे साहस दाखवले आहे तेदेखील निःसंशय दखलपात्र आहे. सन २००९ मध्ये प्रकाशित झालेला हा “मराठी अंत्याक्षरी शब्दकोश ग्रंथ’ असून आपल्या वयाच्या ६४ व्या वर्षी डॉ. बोरकरांनी घेतलेले परिश्रम तरूणाला देखील खाली मान घालायला लावणारे आहे. इंटरनॅशनल बुक ऑफ रेकार्ड ही संस्था नेहमी वर्ल्ड रेकार्ड ऑफ एक्सिलेंन्सच्या शोधात असताना डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांच्या “मराठी अंत्याक्षरी शब्दकोश’ या ग्रंथाची निवड व्हावी, हा केवळ झाडीबोली चळवळीच्या दृष्टीने नाही तर समस्त मराठी साहित्याच्या क्षेत्रात सुद्धा अत्यांदाचा क्षण आहे. ५२ पुरस्कारांनी अलंकृत असलेल्या डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांचा अशाप्रकारे झालेला उल्लेख हा अभिनंदनाचा विषय ठरलेला आहे.