पेंचचे पाणी सुटले, सुर नदी भरली दुथडी

दै.लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- नगरवासीयांची तृष्णा भागविण्यासाठी पेंच धरणाचे पाणी उशीरा कां होईना आता सूर नदी पात्रात सोडण्यात आले असल्याने शहराची पाणी टंचाई दुर झाली असुन सुर नदीत बंधारा बांधुन पाणी अडविण्यात आल्याने नदी दुथडी भरली आहे . हे आल्हाददायक दृश्य येणाऱ्या जाणाऱ्याचे लक्ष वेधुन घेत आहे. सुर नदी कोरडी पडल्याने मोहाडी शहरात मागील दोन ते तीन महिन्यापासून नळाला दोन दिवसा नंतर तेही योग्य पाणीपुरवठा होत नसल्याने पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मोहाडी शहरात विहिरी व हात पंपाला तसेच कुपनलीकेला खारट पाणी लागत असल्याने, येथील नागरीक पिण्याच्या पाण्यासाठी नळाच्या पाण्यावरच अवलंबून असतात.

मोहाडीला पाणीपुरवठा करणारी सुर नदी एप्रिल महिन्यातच कोरडी ठन्न पडली होती. त्यामुळे पेंच धरणाचे पाणी सूर नदीत सोडावे अशी मागणी अनेक नागरिकांनी दोन महिन्यापूर्वीच केली होती. मात्र येथील नगरपंचायत च्या पदाधिकाऱ्यांच्या ढिशाळपणामुळे पेंच धरणाचे पाणी या शनिवारला पोहचले. चांगला पावसाळा लागायला १५ दिवस शिल्लक आहेत. पुढील १५ ते २० दिवसांत नद्या, नाल्यांना पावसाचे पाणी येण्याची शक्यता आहे. लाखो रुपये पेंच प्रशासनाला भरून हे पाणी आणण्यात आले आहे. जर हेच पाणी दोन महिन्यापूर्वी सुर नदिला सोडण्यात आले असते तर मोहाडी येथील जनतेला पाण्यासाठी पायपीट करावी लागली नसती. व पेंच प्रशासनाला भरण्यात आलेले लाखो रुपयांचे चीज झाले असते. काही असो सूर नदीला पेंच धरणाचे पाणी आल्याने आता मोहाडी येथील नळाला दररोज मुबलक पाणी येईल अशी आशा असुन पिण्याच्या पाण्यासाठी महिला. पुरुषांना आता ईकडे तिकडे भटकंती करायची आवश्यकता भाषणार नसल्याने तेही खुश होणार आहेत.