काल म्हणाले मला मोकळं करा, ६ जून ला संघाच्या वरिष्ठांशी २ तास चर्चा; देवेंद्र फडणवीस थेट नागपुरात

नागपूर:- लोकसभा निवडणुकांच्या निकालात देशात एनडीए आघाडीने बहुमताचा आकडा गाठला आहे. मात्र, अब की बार ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपला २४० जागांवरच समाधान मानावे लागले. तर, इंडिया आघाडीनेही २३० पर्यंतचं संख्याबळ गाठलं आहे. त्यामुळे, मोदींच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा देशात एनडीए आघाडीच्या सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रात महायुतीला मोठा पराभव पत्कारावा लागल्याने महायुतीचे सर्वच नेते निराश असल्याचे दिसून येते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन, लोकसभा निवडणुकांतील पराभव मान्य करतो, या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो, असे म्हटले. त्यानंतर, फडणवीस आज संघाची राजधानी आणि त्यांचं होम टाऊन असलेल्या नागपुरात दाखल झाले आहेत. नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या स्वागताला विमानतळावर मोठी गर्दीं झाली होती. महायुतीच्या पराभवानंतर फडणवीसांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी, आपण उपमुख्यमंत्री पदावरुन मुक्त होण्याची विनंती आपण वरिष्ठ नेतृत्वाकडे करणार आहे. आगामी काळात मला पक्षासाठी पूर्णवेळ काम करायचं आहे. त्यामुळे, सत्तेच्या जबाबदारीतून मला मोकळं करावं, असेही फडणवीस यांनी म्हटले. त्यानंतर, भाजपच्या प्रदेशाध्यक्षांस सर्वांनीच फडणवीसांच्या या मागणीला विरोध केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत राहूनच पक्षाचं काम केलं पाहिजे, असेही म्हटले. तर, महायुतीमधील घटक पक्षांनीही फडणवीस हे सत्तेत असले पाहिजे, अशीच भूमिका घेतली. मात्र, फडणवीस आपल्या निर्णयावर अद्याप तरी ठाम असून ते नागपुरात पोहोचले आहेत. नागपूर हा फडणवीसांचा बालेकिल्ला असून स्वगृही त्यांच्या स्वागताला विमानतळावरच मोठीगर्दीं पाहायला मिळाली. नागपुरात आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चां झाली. फडणवीसांच्या धरमपेठ येथील निवासस्थानी सुमारे २ तास ही चर्चां झाल्याची माहिती आहे. आज सकाळी नागपुरात दाखल झाल्यानंतर फडणवीस थेट आपल्या धरमपेठेतील निवासस्थानी गेले होते. नागपुरात संघ शिक्षा वर्ग सुरु असल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व प्रमुख अधिकारी सध्या नागपुरातआहेत. त्यामुळे काही वरिष्ठ अधिकारी फडणवीसांच्या घरी आले, आणि तेथे सुमारे दीड तास चर्चां झाली. या भेटीत नेमकी काय चर्चां झाली याची माहिती नाही. मात्र, काल देवेंद्र फडणवीस यांनी अचानकच महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांच्या निकालांची जबाबदारी स्वतःवर घेत सरकारमधून मुक्त करण्याची विनंती पक्षश्रेष्ठींकडे केली. त्यानंतर, संघ ही सक्रिय झाल्याचं ६ जूनच्या बैठकीतून दिसून येत आहे.