समाज मंदिर बांधकामात गावकऱ्यांचा अडथळा

दै.लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- बिनाखी येथे मंजूर झालेल्या १० लाख रुपयांच्या सभामंडप बांधकामाला शेजारी असणाऱ्या गावातील काही इसमानी विरोध केला आहे. जेसीबी मशीन अडविण्याचा प्रयत्न केला असल्याने प्रकरण थेट पोलिस ठाण्यात पोहचले आहे. शेजारी असणाऱ्या इसमाचे अतिक्रमण आता पोलिसांचे निगराणीत हटविले जाणार असल्याची माहिती उपसरपंच राजेंद्र बघेले यांनी दिली आहे. बिनाखी गावात १० लाख रुपये खर्चाचे सभामंडप मंजूर करण्यात आले आहे. गावातील हनुमान मंदिराचे शेजारी सभामंडप बांधकाम करण्याचे ग्रामपंचायतने निश्चित केले आहे. हनुमान मंदिरात धार्मिक कार्यक्रम होत असताना गावकऱ्यांना सभामंडप नसल्याने अनेक त्रास सहन करावा लागला आहे. हनुमान मंदिराचे शेजारी सभामंडप बांधकाम मंजूर करण्यासाठी गावकऱ्यांनी हा विषय ग्रामसभेत मांडला आहे. गावकऱ्यांना धार्मिक कार्यक्रम घेण्यासाठी सोईचे ठरणार असल्याने आमदारांच्या स्थानिक निधीअंतर्गत सभामंडप मंजूर करण्यात आले आहे. सभामंडप बांधकाम करण्यासाठी महिनाभरापूर्वी कॉलमचे खड्डे खोदण्यात आले आहे. परंतु निधी उपलब्ध नसल्याने कारणावरून बांधकाम थांबविण्यात आले होते. पुन्हा सभामंडप बांधकाम सुरू करण्यात येत असताना गावातील शेजारी असणारे ताना बघेले व त्यांचे कुटुंबियांनी अडविले आहे.

हनुमान मंदिराचे शेजारी त्यांनी जनावरांचा वैरण ठेवला आहे. तनसचे ढीग ठेवले आहे. त्यांचे पक्के बांधकाम नाही. गावच्या विकासाला विरोध हे कुटुंब करीत असल्याचे काही गावकऱ्यांचे म्हणणे आहे. काल रविवारी ग्रामपंचायतचे सरपंच देवेंद्र मेश्राम, उपसरपंच राजेंद्र बघेले व अन्य सदस्य सभामंडप बांधकामसुरू करण्यासाठी जेसीबी मशीन घेऊन गेले असता खड्डे खोदकाम करीत असताना अतिक्रमण धारक इसमानी अडविले आहेत. ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यात आली आहे. खड्डे खोदकाम करीत असताना काही महिलानी बांधकाम रोखण्याचे प्रयत्न करत केले आहेत. यामुळे गावांचे विकासाला खीळ बसणार आहे. यामुळे ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यानी थेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.गावाचा विकास प्रभावित होत असल्याने पोलिसांच्या निगराणीत अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहेत. सभामंडप निश्चित जागेवरच बांधकाम करण्यात येणार आहे. अतिक्रमण धारकांची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही. अशी भूमिका ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. वेळप्रसंगी अतिक्रमण धारकांच्या घरावर बुलडोजर चालणार असल्याचे सांगण्यात आले आहे. गावाच्या विकासात अडथळा निर्माण करणाऱ्या अतिक्रमण धारकांची गय केली जाणार नाही, अशी माहिती सरपंच देवेंद्र मेश्राम यांनी दिली आहे.